द्वेषाच्या भिंती पाडणारी ‘ऐक्य दिंडी’; वारीच्या वाटेवर पुण्यात उमटला माणुसकीचा आणि बंधुभावाचा पाझर.!


द्वेषाच्या भिंती पाडणारी ‘ऐक्य दिंडी’; वारीच्या वाटेवर पुण्यात उमटला माणुसकीचा आणि बंधुभावाचा पाझर.!

काल पुण्याच्या रविवार पेठेत आणि नाना पेठेत जे घडलं, ते पाहून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांच्या काळजाला थोडी जरी माणुसकीची चाड आहे, त्यांनी या वारीच्या वाटेवर येथे येऊन पाहावे, माणसाच्या रक्तातील माणुसकीचा पाझर कसा फुटतो! आज देशात धर्म-जातीच्या नावावर भिंती उभारल्या जात असताना, पुण्याच्या याच मातीत संतांच्या विचारधारेचा एक अनोखा आणि डोळे दीपवून टाकणारा चमत्कार पाहायला मिळाला. निमित्त होते आषाढी वारीचे आणि निमित्त होते ‘दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेच्या’ शाखेत आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे. मैलोनमैल चालून ज्या पायांना फोड आलेत, त्या माऊलींच्या पायांची सेवा करायला जेव्हा मुस्लिम बांधव पुढे सरसावले, तेव्हा समाजातल्या द्वेषाच्या भिंती एका क्षणात पत्त्यांसारख्या कोसळून पडल्या.

रविवार पेठेतल्या त्या बँकेच्या शाखेत जेव्हा एखादा वारकरी पाऊल टाकत होता, तेव्हा तिथं धर्म विरघळला होता आणि उरली होती फक्त सेवा. कोणीतरी वारकऱ्याच्या कपाळावरचा घाम पुसत होतं, तर कोणीतरी त्याच्या हातात मोफत औषधं टेकवून ‘माऊली, सांभाळून जा’ असं म्हणत होतं. वैद्यकीय तज्ज्ञ जेव्हा त्यांची तपासणी करत होते, तेव्हा तो संवाद डॉक्टर आणि रुग्णाचा नव्हता, तो संवाद एका भावाचा दुसऱ्या भावाशी असलेला जिव्हाळा होता. धर्म जर माणसाला माणसापासून तोडत असेल, तर तो धर्म कसला? खरा धर्म तर तोच जो वारकऱ्याच्या पायातल्या काट्याचं शल्य आपल्या काळजात अनुभवतो. काल पुण्यात याच खऱ्या मानवी धर्माचा साक्षात्कार झाला.

आरोग्य शिबिरानंतर नाना पेठेतील साखळीपीर तालीम येथून जेव्हा ‘सर्वधर्मीय ऐक्य दिंडी’ निघाली, तेव्हा अवघं वातावरण टाळ-मृदंगाच्या गजरात एकरूप झालं होतं. एका बाजूला विठूनामाचा गजर आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक सलोख्याची प्रार्थना! या दिंडीच्या अग्रभागी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आबेदा इनामदार, शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, रिझवानी मस्जिद ट्रस्टचे अंजुम भाई, सूफी वारकरी विचार मंचाचे मशकूर अहमद शेख, उमर शरीफ शेख, मुस्लिम बँक संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , इरफान शेख आणि अब्दुल वहाब शेख यांच्यासह अनेक मान्यवर खांद्याला खांदा लावून चालत होते. टोपी आणि फेटा जेव्हा एकत्र चालतात, तेव्हा या देशातल्या लोकशाहीचा आणि संस्कृतीचा खरा कणा ताठ होतो, हेच काल या दिंडीने दाखवून दिले.

अंगरशा बाबा दर्गा मार्गे निघालेली ही दिंडी जेव्हा गंज पेठेतील रिझवानी मशिदीपाशी पोहोचली, तेव्हा तिथे सलग आठव्या वर्षी एक नवा इतिहास लिहिला गेला. मशिदीच्या दारात वारकऱ्यांचे स्वागत डोळ्यात पाणी आणणारे होते. तिथे डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या वतीने वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. हे दृश्य पाहून कोणत्या दगडाच्या काळजाच्या माणसाला पाझर फुटणार नाही? ज्या मशिदीच्या आवारात नमाज पठण होते, त्याच मशिदीच्या छायेखाली विठ्ठलाच्या वारकऱ्याला विश्रांती मिळत होती आणि मदतीचा हात दिला जात होता.

पुण्याने देशाला नेहमीच नवी दिशा दिली आहे. कालच्या या दिंडीने आणि आरोग्य शिबिराने दाखवून दिले की, समाजविघातक शक्ती कितीही द्वेषाची विषवल्ली पेरत असल्या, तरी संतांच्या या महाराष्ट्रात माणुसकीचा, सामाजिक सलोख्याचा आणि बंधुभावाचा झरा कधीही आटणार नाही. या उपक्रमाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. ही वारी केवळ पंढरीची नव्हती, तर ती मानवी मनाच्या शुद्धीकरणाची ‘ऐक्य वारी’ होती!

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!