पुणे पोलिसांचा कडेकोट चक्रव्यूह; ६७ लाखांची रोकड जप्त अन ३ हजार जणांना कोठडीचा रस्ता.!


पुणे पोलिसांचा कडेकोट चक्रव्यूह; ६७ लाखांची रोकड जप्त अन ३ हजार जणांना कोठडीचा रस्ता!

पुणेरी राजकारणाचा पारा सध्या चांगलाच चढला आहे! महापालिकेच्या या रणमैदानात कुणाचे घोडे गंगेत न्हाणार आणि कुणाची दाणादाण उडणार, याचा फैसला लवकरच होईल. पण, त्याआधी पुण्याच्या गल्लीबोळांत आणि पेठापेठांत चक्क खाकीचा पहारा बसला आहे. पुणे महापालिकेची ही निवडणूक पारदर्शक, निर्भय आणि मुख्य म्हणजे ‘शांततेत’ पार पडावी, यासाठी पुणे पोलीस दलाने जणू कंबरच कसली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शहराभोवती असा काही ‘चक्रव्यूह’ रचला आहे की, गुंडापुंडांचीच काय, पण साध्या टवाळखोरांचीही पाचावर धारण बसली असेल!

१४ हजार पोलिसांची ‘फौज’ मैदानात! शहरात सध्या पोलिसांचा इतका राबता आहे की, कुणी विनाकारण शिंगे वर केली तर त्याची गय केली जाणार नाही. अहो, आकडा तरी बघा! तब्बल १४ हजार पोलिसांची फौज पुण्याच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरली आहे. जणू पुण्याचे रूपांतर छावणीत झाले आहे. या जोडीला साडेतीन हजार होमगार्ड्स आणि राज्य राखीव दलाच्या चार कंपन्याही तैनात आहेत. शहराचे एकूण ८८ विभाग करून १०० पेक्षा जास्त ‘संवेदनशील’ ठिकाणे पोलिसांनी आधीच ‘टार्गेट’ केली आहेत!

चांदीची जोडवी अन रोकड; कुठे नेऊन ठेवलीय निवडणूक माझी? निवडणूक म्हटली की लक्ष्मीदर्शन आलेच! पण अमितेश कुमारांच्या पथकाने या छुप्या ‘अर्थकारणाला’ सुरुंग लावला आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर पोलिसांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ सुरू केला आहे. आतापर्यंत ६ दखलपात्र आणि ११ अदखलपात्र गुन्हे दाखल झाले असून ३ हजार ४३९ जणांना थेट कोठडीचा रस्ता दाखवण्यात आला आहे. येवलेवाडीत दोन वाहने अडवून लाखाची रोकड जप्त केली, तर कुठे मतदानाच्या स्लीपसोबत ‘चांदीची जोडवी’ वाटणाऱ्यांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले आहेत! आतापर्यंत ६७ लाखांची रोकड जप्त करून पोलिसांनी ‘माया’ जमवणाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत.

हिंसाचाराला थारा नाही, पुण्याचा ‘स्वॅग’ कायम! सर्वात दिलासादायक आणि अभिमानाची बाब म्हणजे, इतका राडा, इतकी चुरस असूनही शहरात निवडणुकीच्या संदर्भात हिंसाचाराचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही! हे पुणे आहे, इथे विचारांची लढाई होते, शस्त्रांची नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा तीनतेरा वाजू नये, यासाठी पोलीस अहोरात्र रस्त्यावर उभे आहेत.

थोडक्यात काय..? तर, यंदाची निवडणूक ‘राडा’ करण्यासाठी नाही, तर ‘मतदानासाठी’ आहे, हे पोलिसांनी ठणकावून सांगितले आहे. “नागरिकांनी आता घराबाहेर पडावे आणि निर्भयपणे मतदान करावे,” असे आवाहन खुद्द पोलीस दलाने केले आहे. बाकी, कुणी वाकडं पाऊल टाकायचा प्रयत्न केलाच, तर पुणे पोलिसांचा लाठीप्रसाद तयारच आहे, हे विसरू नका!

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!