कोरोचीच्या रणांगणात ‘बॅलेट’चे महाभारत; गुलालासाठी कोल्हापुरी तावडी सज्ज..!

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुराळा आता खाली बसला असला, तरी राजकीय आखाड्यातील धुरळा मात्र मतदारांच्या डोक्यात अजूनही कायम आहे! कोरोचीच्या या मातीत यंदा राजकारणाचं असं काही ‘रसायण’ शिजलंय की, कोणाचा विजय आणि कोणाचा पराभव, याचा अंदाज लावताना ज्योतिषांचीही पाचावर धारण बसली आहे.
आवाडे-कोराणे यांची ‘जंग-ए-आझादी’!
कोरोची मतदारसंघाच्या सिंहासनासाठी कु. सानिका राहुल आवाडे आणि सौ. दिपाली विनोद कोराने यांच्यात जी काही जुंपली आहे, ती पाहताना ‘दोघींचेही पाय मातीत आणि नजरा मात्र सत्तेच्या आकाशाकडे’ अशीच काहीशी स्थिती आहे. आवाडे घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना, समोर कोराणे यांनीही ‘महाविकास आघाडी’ची वज्रमुठ आवळून कडवे आव्हान उभे केले आहे. ही निवडणूक नसून जणू ‘रणसंग्राम’च आहे, अशा थाटात गेले आठ-दहा दिवस प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या.
पंचायतीचे ‘पैलवान’ सज्ज.!
कोरोची पंचायत समितीसाठी सुमेध ऊर्फ सनी ओऊळकर आणि आनंदा शेट्टी यांच्यात जी ‘कुस्ती’ रंगली आहे, ती पाहून प्रेक्षकांनाही घाम फुटलाय! तिकडे तारदाळमध्ये सौ. प्रियांका खोबरे आणि सौ. अनिता शिंदे यांच्यातील लढत म्हणजे चोवीस कॅरेटचं राजकारण! एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप आणि सभांमधील वाक्युद्ध पाहताना कोरोचीचा परिसर अक्षरश: ढवळून निघाला होता.
उन्हाचा कडाका आणि मतदारांचा तडाखा.!.
शनिवारी सकाळी ७ वाजता जेव्हा मतदानाची घंटा वाजली, तेव्हापासूनच मतदारांनी केंद्रावर रांगा लावल्या होत्या. दुपारी सूर्यनारायण कोपले आणि मतदानाची गती मंदावली. पण दुपारी ३ नंतर उन्हाचा कडाका कमी होताच, लोकशाहीचे हे पाईक पुन्हा घराबाहेर पडले!
तारदाळमध्ये ७२.७१ टक्के मतदारांनी आपल्या बोटाला शाई लावून घेतली.
खोतवाडीत ६७.३४ टक्के तर कोरोचीमध्ये ६८.१८ टक्के मतदान झाले.
प्रशासनाचा ‘पांगळा’ कारभार!
मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होती, पण सोयीसुविधांचा मात्र ‘दुष्काळ’ होता! भर उन्हात उभे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी ना सावलीची सोय, ना पिण्याच्या पाण्याची! “मत मागताना वाकून नमस्कार करणारे पुढारी आणि सोयी देताना हात झटकणारे अधिकारी” अशा शब्दात मतदारांनी आपला संताप व्यक्त केला. लोकशाहीच्या उत्सवात मतदारांना उन्हात ताटकळत ठेवणे, हा कसला न्याय? असा परखड सवाल आता कोरोचीतील नागरिक विचारत आहेत.
आता प्रतीक्षा ‘विजयाची’!
पोलिसांचा चोख बंदोबस्त, कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि किरकोळ वादावादीचे ‘तडके’ सोसून अखेर उमेदवारांचे नशीब मतपेटीत (ईव्हीएममध्ये) बंद झाले आहे. आता गल्लीबोळात फक्त एकच चर्चा- “कोण येणार? सानिकाताई की दिपालीताई? सनी की आनंदा?”. प्रत्येक कार्यकर्ता आपल्याच नेत्याच्या विजयाचा छातीठोक दावा करत असला, तरी उद्या जेव्हा मतपेट्या बोलू लागतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने कोरोचीचा ‘वाघ’ कोण आणि ‘मेंढी’ कोण, हे स्पष्ट होईल!
उद्याच्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले असून, कोरोचीच्या मातीत कोणाचा गुलाल उधळला जाणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे!




























