अवघ्या ६,६०० रुपयांच्या फायद्यासाठी २३ जणांचा बळी! पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारू कांड; ८ जूनपर्यंत कोठडी, ९ पोलीस निलंबित
पिंपरी : चंद्रशेखर पात्रे :
पुणे, हडपसर, दापोडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्राशन केल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता २३ वर पोहोचली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य आरोपीने अवघ्या ६ हजार ६०० रुपयांच्या नफ्यासाठी निष्पाप लोकांच्या जिवाशी खेळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे.
मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने केलेल्या पैशांच्या गणिताचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. अवघ्या काही हजारांच्या नफ्यासाठी हा जीवघेणा प्रयोग करण्यात आला. आरोपी योगेशने ९ मे रोजी १७,५०० रुपयांचे २१० लिटर घातक ‘मिथेनॉल’ खरेदी केले होते. त्यानंतर २३ मे रोजी त्याने ३५ लिटरचे ५ ड्रम गावठी दारू ९,५०० रुपयांना विकत घेतली. म्हणजेच त्याचा एकूण खर्च २७,००० रुपये झाला होता. यानंतर त्याने ५ ड्रम दारूमध्ये ५ ड्रम पाणी मिसळून आधी १० ड्रम तयार केले. त्यानंतर त्यात निम्म्याहून अधिक विषारी मिथेनॉल ओतून एकूण १२ ड्रम घातक दारू तयार केली. हे १२ ड्रम त्याने प्रति ड्रम २,८०० रुपयांप्रमाणे विकले, ज्यातून त्याला ३३,६०० रुपये मिळाले. विक्रीतून मिळालेले ३३,६०० रुपये आणि खरेदीचा खर्च २७,००० रुपये वजा केला, तर त्याला अवघा ६ हजार ६०० रुपयांचा नफा झाला होता.
या विषारी दारू प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे याच्यासह कर्नलसिंग विरखा, गुरुमित सिंग विरखा आणि राधेश्याम प्रजापती अशा एकूण ८ जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. दुसरीकडे, हद्दीत बेकायदेशीर दारूचे अड्डे सुरू असतानाही दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी संयुक्त कारवाई केली आहे. यात ९ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या प्रकरणाची पाळेमुळे शोधताना थेट भिवंडी येथील एका कंपनीवर छापा टाकला. तेथून ५ हजार किलोहून अधिक घातक मिथेनॉल जप्त करण्यात आले आहे, ज्याचा पुरवठा पुण्यातील या विक्रेत्यांना झाला होता. दरम्यान, महापालिकेच्या वतीने मृतकांच्या पीडित कुटुंबांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवडमधील मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि हे अवैध दारू अड्डे कायमचे उद्ध्वस्त करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही पीडित कुटुंबांची भेट घेतली. पोलीस कारवाई करतात, पण काही दिवसांनी हे अड्डे पुन्हा फोफावतात, हे आता कायमचे बंद झाले पाहिजे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत परिसरातील अनेक बेकायदेशीर दारूचे अड्डे स्वतःहून उद्ध्वस्त केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सीआयडी (CID) करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे.


























