अग्रलेख: यंत्रांचा उदय आणि माणसाचा अस्त..!

भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चार वर्षांच्या चिमुरडीचा जो अघोरी अंत झाला, त्याने केवळ महाराष्ट्र हादरला नाही, तर माणुसकीची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीला मिळाली आहे. ६५ वर्षांचा नराधम भीमराव कांबळे पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना निर्लज्जपणे गुन्ह्याची कबुली देतो, तेव्हा हा केवळ एका व्यक्तीचा कबुलीजबाब उरत नाही; तो समाज म्हणून आपल्या सामूहिक अपयशाचा जळजळीत पुरावा ठरतो. या भीषण घटनेचे गांभीर्य आणि समाजाची बोथट झालेल्या संवेदना पाहून ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ या वृत्तसंस्थेने काल सायंकाळपर्यंत आपले सर्व लेखन आणि कामकाज बंद ठेवून निषेध व्यक्त केला हा केवळ एक निषेध नाही, तर स्वतःच्या भूमिकेचे केलेले कठोर आत्मपरीक्षण आहे.
आजच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत, जिथे प्रत्येक माध्यम घटनेचे भांडवल करून टीआरपी वाढवण्याच्या शर्यतीत असते, तिथे प्रेस मीडिया लाईव्हने दाखवलेली ही संवेदनशीलता कौतुकास्पद आहे. “इतर बेजबाबदार घटकांप्रमाणेच प्रसारमाध्यम म्हणून आमचीही भूमिका अयोग्यच ठरली आहे,” ही प्रांजळ कबुली देऊन या संस्थेने पत्रकारितेतील नीतिमत्तेचा एक नवा आदर्श उभा केला आहे. जेव्हा समाजाचा विवेक झोपतो, तेव्हा शब्दांपेक्षा ‘मौन’ अधिक प्रभावी ठरते, हेच या कृतीतून सिद्ध झाले आहे.
माणसाने आज तंत्रज्ञानाच्या शिखरावर पाय ठेवला आहे. आपण AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) निर्माण केली, पण स्वतःची उपजत ‘विवेक बुद्धिमत्ता’ मात्र गहाण ठेवली. गल्लीबोळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरले आहे, पण हे निर्जीव कॅमेरे फक्त रक्ताने माखलेला इतिहास रेकॉर्ड करू शकतात; ते कोसळणारी कुऱ्हाड रोखू शकत नाहीत. १३५ कोटी लोकसंख्येच्या या अफाट देशात आपण माणसांच्या गर्दीत राहतो की चालत्या-बोलत्या प्रेतांच्या? असा प्रश्न आज पडू लागला आहे. आजूबाजूला संशयास्पद हालचाली दिसतात, पण ‘मला काय त्याचे?’ या स्वार्थी प्रवृत्तीमुळे आपण सोयीस्कर मौन पाळतो. ही संवेदनेची बोथट झालेल्या धार आज त्या चिमुरडीच्या गळ्यापर्यंत पोहोचली, उद्या ती कोणाच्याही घरापर्यंत पोहोचू शकते.
निसर्गाने माणसाला बुद्धी दिली आणि त्याला इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवले. पण अशा घटना पाहिल्या की वाटतं, जंगलातील श्वापदंही या नराधमापेक्षा कैक पटीने बरी! स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या मानवाने आता आरशासमोर उभे राहून स्वतःलाच विचारायची वेळ आली आहे की, आपण प्रगती करत आहोत की अधोगती?
प्रेस मीडिया लाईव्हने काल कामकाज बंद ठेवून दिलेला हा इशारा समाजाच्या सुस्त झालेल्या भावनेला दिलेला एक धक्का आहे. या धाडसी आणि भावनिक निर्णयाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. जोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्ती सतर्क होत नाही, जोपर्यंत शेजारच्या मुलीला स्वतःची मुलगी मानण्याची दृष्टी येत नाही, तोपर्यंत कितीही कायदे केले तरी या नराधमांना चाप बसणार नाही. आता वेळ केवळ हळहळण्याची नाही, तर स्वतःमधील मेलेली संवेदना पुन्हा जिवंत करण्याची आहे!
आता या असल्या नराधमांचे करायचे काय? ‘तारीख पे तारीख’ देऊन सोडायचे की, होऊ घातलेल्या गुन्हेगाराला धडकी भरेल, अशी तत्काळ भयंकर न्यायपूर्वक शिक्षा द्यायची? या सगळ्या पार्श्वभूमीवर माणुसकीला काळिमा फासणार्या त्या विकृत गुन्हेगाराला तत्काळ आणि न्यायाच्या अंतिमतेची शिक्षा व्हायलाच हवी!


























