देहुरोडमध्ये दिवंगत रमेश आण्णा रेड्डी यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली; गुन्हेगारांवर कडक कारवाईची नेत्यांची मागणी


 देहुरोड मध्ये दिवंगत रमेश आण्णा रेड्डी यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली; गुन्हेगारांवर कडक कारवाईची नेत्यांची मागणी

चंद्रशेखर पात्रे :

देहुरोड : भाजपचे सक्रिय कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देहुरोड येथील वैश्य समाज मंदिर येथे सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. २८ एप्रिल रोजी रमेश रेड्डी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे. शोक सभे दरम्यान उपस्थित नेत्यांनी आणि नागरिकांनी रेड्डी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी रेड्डी यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते, तर उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

मुळशी पॅटर्न’सारखी परिस्थिती; मावळमधील ‘बक्कासुरांचा’ बंदोबस्त करा: धनराज शिंदे

व्यापारी संघटनेचे धनराज शिंदे यांनी शहरातील बिघडत्या कायदा व सुव्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली. “आज शहराची अवस्था ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमासारखी झाली असून शहरात ‘बक्कासूर’ निर्माण झाले आहेत,” असा घणाघात त्यांनी केला. तसेच राज्याचे माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी याबाबत उच्चस्तरीय बैठक घेऊन मावळमधील अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.

कुटुंबाचा आधारवड गेला; पोलिसांचा वचक कुठे? : संजय पिंजण

संजय पिंजण यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, मागील वर्षीच रमेश रेड्डी यांच्या सख्या भावाचीही अशीच हत्या झाली होती. आता त्याच कुटुंबातील मुख्य आधारवड असलेल्या रमेश यांची चार पिस्तुलांतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक निर्माण होणे गरजेचे असून या नराधमांना कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

हत्येचा कट ४ महिन्यांपूर्वीच; मलाही जीवे मारण्याची धमकी: अमिन शेख

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व नगरसेवक अमिन शेख यांनी धक्कादायक खुलासा केला. “रमेश रेड्डी यांच्या हत्येचा कट चार महिन्यांपूर्वीच रचला गेला होता आणि मी स्वतः रमेश यांना चार वेळा याबाबत सतर्क केले होते,” असे ते म्हणाले. “पहिले रमेश रेड्डी को मारेंगे, फिर अमिन शेख को मारेंगे,” अशी धमकी असल्याचे सांगत त्यांनी या हत्येमागील मुख्य सुत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली. गरज पडल्यास न्याय मिळवण्यासाठी जेलमध्ये जाण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली.

गृहखाते निष्क्रिय, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा: ॲड. कैलास पानसरे

भाजपचे ज्येष्ठ नेते व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मनोनीत अधिकारी ॲड. कैलास पानसरे यांनी थेट गृहखात्यावर निशाणा साधला. “राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गृहखाते निष्क्रिय झाले आहे. रमेश रेड्डींसारख्या सरळ स्वभावाच्या कार्यकर्त्याची हत्या होणे निंदनीय आहे,” अशा शब्दांत त्यांनी निषेध नोंदवला. पोलिसांनी दोषारोपपत्र (चार्जशीट) आणि सप्लीमेंट्री मजबूत करून गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

 सत्ता आमची असली तरी चुकीला माफी नाही: सूर्यकांत सुर्वे

सूर्यकांत सुर्वे यांनी स्वपक्षीय सरकारवर बोट ठेवत सांगितले की, “सत्ता जरी आमची असली तरी गृहखाते जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल आणि लोकांचे जीव जात असतील, तर गृहखातेच याला जबाबदार आहे.” एसआयटीच्या (SIT) माध्यमातून चुकीचे रिपोर्ट जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार: लहु शेलार

भाजपचे माजी शहराध्यक्ष लहु शेलार यांना श्रद्धांजली वाहताना अश्रू अनावर झाले होते. “रमेश रेड्डी यांना न्याय मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही. तो गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, त्याला सोडणार नाही. शेवटपर्यंत लढा देणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 २१ गोळ्या झाडल्या, शहरात घबराट: विनोद भंडारी आणि संजय धुतडमल

विनोद भंडारी यांनी सांगितले की, एका सक्रिय कार्यकर्त्यावर २१ गोळ्या झाडल्या गेल्याने शहरात प्रचंड घबराट आहे. या प्रकरणात १७ लोकांना अटक झाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात मोजक्याच लोकांवर कारवाई झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तर पत्रकार बांधवांच्या वतीने संजय धुतडमल यांनी शोक व्यक्त करताना, रेड्डी यांच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले.

पक्षात काम करावे की नाही, असा प्रश्न: भाजप शहराध्यक्ष रघुवीर शेलार

भाजप शहराध्यक्ष रघुवीर शेलार यांनी अत्यंत गंभीर चिंता व्यक्त केली. “देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री असतानाही जर अशा प्रकारे भररस्त्यात खून होत असतील, तर ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी चिंतेची बाब आहे. यामुळे आता पक्षात काम करावे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे,” अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. देहुरोड शहराचे नाव खराब होत चालले असून, आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

एकत्रित निवेदनाची घोषणा :

या घटनेच्या निषेधार्थ देहुरोडमधील सर्वपक्षीय नेते आपापल्या लेटरहेडवर एकत्र येऊन एक संयुक्त निवेदन तयार करणार आहेत. हे निवेदन पोलीस अधीक्षक (SP), पोलीस आयुक्त (CP) आणि गृहमंत्र्यांना देऊन शहरात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी केली जाणार आहे. शोक सभेच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी “रमेश रेड्डी यांना न्याय मिळालाच पाहिजे” अशा जोरदार घोषणा दिल्या.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!