इचलकरंजीत ‘रोमियो’ जोरात, पोलीस सुस्त! भाजप महिला आघाडी आक्रमक !
इचलकरंजी : सध्या आपल्या इचलकरंजीत कायद्याचे राज्य चालू आहे की ‘मजनू भाईं’चे गल्लीबोळांतील साम्राज्य, असा यक्षप्रश्न सामान्य नागरिकाला पडला आहे. गल्लीबोळांत आणि शाळा-कॉलेजांच्या दारात काही सुसाट फिरणारे उडाणटप्पू ‘लव्ह जिहाद’ आणि रोमिओगिरीचे विळखे घालत फिरत आहेत, आणि आपले पोलीस मात्र गुन्हेगारांना पकडण्याऐवजी बहुधा कोणत्या चहाच्या टपरीवर ‘शांतता’ कशी राखायची, यावर चिंतन करत बसले असावेत! ज्या कोल्हापूरच्या मातीत शाहू महाराजांचा रुबाब होता, तिथे आज पोरीबाळींना रस्त्यावरून जाताना असल्या मजनूंचा त्रास सहन करावा लागतोय, ही खरोखरच डोक्यात तिडिक आणणारी गोष्ट आहे. यामुळेच आज संतापलेल्या भाजप महिला आघाडीच्या रणरागिणींनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घुसत पोलिसांचा चांगलाच ‘सत्कार’ केला.
पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या नेत्या निताताई केळकर यांच्या जळजळीत नेतृत्वाखाली आज पोलिसांनी नुसते निवेदन घेतले नाही, तर हवालदारांपासून ते साहेबांपर्यंत सगळ्यांचे कान इतके कडक टोचले की काही काळ पोलीस ठाण्यातील पंखेही भीतीने जोरात फिरू लागले!
निताताईंनी पोलिसांना पहिलाच बाण मारला की, मोठ्या गाजावाजाने सुरू केलेले ‘निर्भया पथक’ सध्या कोणत्या कोपऱ्यात घोरत पडले आहे? गुन्हा घडल्यावर पोलीस गाड्यांचे सायरन वाजवत येतात, हा सिनेमा ठीक आहे; पण गुन्हा घडूच नये म्हणून तुमची खाकी वर्दी रस्त्यावर कधी रुबाब दाखवणार, की फक्त वाहतुकीचे पावती पुस्तक फाडण्यातच पोलिसांचा सगळा पराक्रम खर्च होणार आहे? शाळा सुटण्याच्या वेळी कॉलेजांच्या बाहेर जे फुलपाखरे घिरट्या घालत असतात, त्यांच्या पाठीत चार सोटे हाणायला पोलिसांना मुहूर्त कशाला हवा, असा रोखठोक सवाल त्यांनी केला.
भाजप महिला आघाडीने पोलिसांना थेट अल्टीमेटम दिला आहे. बंद पडलेले निर्भया पथक तात्काळ गॅरेजमधून बाहेर काढून रस्त्यावर आणले पाहिजे, शाळा-कॉलेजांत नुसत्या पाट्या टाकण्यापेक्षा मुलींना सेल्फ-डिफेन्स आणि सायबर क्राईमचे डोस पाजले पाहिजेत, आणि अशा प्रकरणांच्या तपासासाठी स्पेशल महिला अधिकाऱ्यांची नेमणूक झाली पाहिजे. जेणेकरून या रोडरोमिओंची थेट न्यायालयात रवानगी होऊन त्यांना जेलची हवा खाता येईल.
आता या सगळ्या प्रकरणाची फाईल थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या टेबलावर आदळणार आहे, असा सज्जड दमही निताताईंनी दिला आहे. “महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत जर पोलिसांनी ढिलाई दाखवली, तर पुढच्या वेळी महिला आघाडी केवळ निवेदन घेऊन येणार नाही, तर थेट भाजप स्टाईलने आंदोलन करेल,” असा इशारा रमाताई फाटक, अश्विनी कुबडगे आणि सपना भिसे यांनी दिला तेव्हा पोलिसांच्या कपाळावर घाम फुटला नसता तरच नवल!
अहो, सत्ताधारी असो वा विरोधी, पण माय-भगिनींची अब्रू जर रस्त्यावर धोक्यात येत असेल, आणि पोलीस यंत्रणा जर फक्त तमाशा पाहत असेल, तर अशा सुस्त प्रशासनाला साष्टांग नमस्कार घालण्यापेक्षा त्यांच्या पाठीत सोटा हाणलेला काय वाईट? इचलकरंजीच्या पोलिसांनो, आता तरी त्या खुर्च्या सोडवून रस्त्यावर या, नाहीतर या महिला आघाडीच्या रणरागिणी तुम्हाला पळता भुई थोडी करतील, हे नक्की लक्षात ठेवा!



























