युद्धाचे पाच दिवस 


युद्धाचे पाच दिवस 

—————

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

यावर्षीचा फेब्रुवारी महिना नेहमीप्रमाणे आपल्या मध्यावर व्हॅलेंटाईन डे साजरा करून गेला. मात्र जाताना युद्धाचा भडका उडवून गेला. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्चनेते आयातुल्ला सय्यदअली हुसेनी खामेनी ( वय ८६)यांच्याबरोबर त्यांचे कांही कुटुंबीय आणि इराणचे कांही महत्वाचे लष्करी अधिकारी मारले गेले. त्यानंतर हे युद्ध सुरू झालेले आहे. हे लिहीत असताना हा युद्धाचा पाचवा दिवस आहे. आज इराणी युद्धनौका श्रीलंकेजवळच्या सागरामध्ये अमेरिकन पाणबुडीने उडवून देण्यात आली आहे. त्यात ८० जणांचा बळी गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी इराणच्या एका शाळेवर बॉम्ब टाकून पावणे दोनशेवर विद्यार्थी विद्यार्थिनींना ठार करण्यात आले होते. एकूण या युद्धामध्ये गेल्या चार दिवसात एक हजारावर माणसे मारली गेली आहेत. त्यात तीन भारतीयांचाही समावेश आहे.

एकूणच युद्धाची सूत्रे आतताई नेतृत्वाकडे गेल्याने युद्धाच्या भीषणतेत वाढ झालेली आहे. या युद्धाने प्रादेशिक अस्थिरतेचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे युद्ध अजून किमान चार-पाच आठवडे चालेल अशी भाषा करत आहेत. खरंतर त्यांना दोन-चार दिवसात इराणला शरण आणण्याची खुमखुमी होती. पण इराणच्या प्रतिकारामुळे आता ही भाषा करावी लागत आहे.इस्त्रायलही पूर्ण क्षमतेने इराण बेचिराख करायला निघाला आहे. तसेच इराणकडूनही प्रत्युत्तराची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकूणच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. जागतिक शांततेला सुरुंग लागलेला आहे.इराणवरील या हल्ल्याने आंतरराष्ट्रीय शांतता, आंतरराष्ट्रीय कायदे ,आंतरराष्ट्रीय संस्था यांना पुन्हा एकदा मोठा तडा गेलेला आहे. खोटी कारणे देत इराकवर हल्ला करून सद्दाम हुसेन यांना ज्या पद्धतीने ठार मारले तसा प्रयत्न अमेरिका अनेकवेळा करते. अफगाणिस्तान,लिबिया आदी ठिकाणीही ते दिसले. इथेही तसेच झालेले आहे. पण अमेरिकेच्या या धोरणाने दहशतवाद आणि अराजकताच वाढत गेलेली आहे हा इतिहास आहे.

खरे तर गेले काही महिने इस्रायल इराणवर अमेरिकेने हल्ला करावा अशी परिस्थिती निर्माण करीत होती. तसेच ट्रम्प यांच्या खुमखुमीमुळे एक संयुक्त षडयंत्रही आखले जात होते. काही महिन्यापूर्वी अमेरिकन विमानाने इराणच्या अणुभट्ट्या उध्वस्त केल्या होत्याच. तेच ट्रम्प सध्या इराणशी वाटाघाटीही करत होते.काही दिवसापूर्वी अमेरिका आणि इराक यांच्यात त्याबाबत कराराची चर्चाही झाली होती. पण अखेर अमेरिकन अंतर्गत राजकारणात ट्रम्प यांची होत असलेली पीछेहाट बरोबर हेरून इजरायलने हा हल्ला त्यांना करायला लावला. अमेरिकेची मध्यावधी निवडणूक काही महिन्यांवर आलेली आहे.तसेच सध्या जगभर गाजत असलेल्या एपस्टीन फाईलचा विषय आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टेरीफबाबत ट्रम्प यांना दिलेला दणका यातून ट्रम्प यांची राजकीय पिछेहाट होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी ट्रम्प यांना काहीतरी करणे भाग होते. त्यातूनच ते या युद्धात केवळ सहभागी झाले नाहीत तर त्याची सारी सूत्रे स्वतःकडे घेऊन अमेरिकेला आणि जगाला त्यांनी युद्धाच्या परिस्थितीत ढकलले आहे. बेंजामिन नेत्यांना ट्रम्प च्या काठीने साप मारत आहेत. त्यात ते यशस्वी झाली आहेत. कारण खामेनी यांना ठार मारणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते.ते त्यांनी साध्य केले आहे.

इराणवर हल्ला केल्याची जी कारणे सांगितली जात आहेत ती अत्यंत तकलादू आहेत. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगासह अनेकानी इराण अणुबॉम्ब बनवत नाही असे दाखले दिले होते. पण ते काहीही लक्षात न घेता इजरायल व अमेरिकेने त्याचे भांडवल करून हे युद्ध आपल्या मस्तखोर आणि युद्धखोर भूमिकेतून लाभलेले आहे. ट्रम्प आणि बेंजामिन नेत्यांनाहू हे दोघेही या युद्धात ‘आम्हाला आमचा देश वाचवायचा आहे ‘ अशी भाषा करून त्याला वेगळा रंग देऊन स्वतःचे समर्थन करू पाहत आहेत. कर्तव्य व कर्तृत्वशून्य आणि बदमाश माणसे सत्तेवर असताना अनेकदा आपल्या देशभक्तीचे विकृत प्रदर्शन मांडत असतात हा जगाचा इतिहास आहे. हाही त्याचाच भाग आहे. खरे तर या मंडळींना आपल्या देशाशी, राष्ट्राशी काहीही कर्तव्य नसते. त्यांना निवडणुका जिंकायच्या असतात आणि स्वतः सत्तास्थानी अबाधीत राहायचे असते. हे यावेळीही दिसले आहे. अनेक अमेरिकन माध्यमेही ट्रम्प व नेत्यांनाहू यांची ही लबाडी उघड करत आहेत. या युद्धाचे समर्थन करणाऱ्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. या युद्धाच्या विरोधामध्ये अमेरिकेसह जगभरची जनता विविध ठिकाणी रस्त्यावर येत आहे. शांततेचे नोबेल मिळाले नाही म्हणून त्रागा करणाऱ्या ट्रम्प यांचे युद्धखोरीचे राजकारण वारंवार उघड झालेले आहे. त्यांनी व्हेनेझुएला पाठोपाठ हेही युद्ध अमेरिकेवर लादलेले आहे. हेच ट्रम्प भारत – पाकिस्तानसह अनेक युद्धे मी थांबवली आहेत असेही सांगत असतात हा भाग वेगळाच. शिवाय त्यांनी भारताचे नाव घेऊनही आपण देश म्हणून त्याविषयी काही प्रतिक्रिया देत नाही हा त्याहूनही फार मोठा वेगळा भाग आहे.

इराणच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करण्याचे इजरायल व अमेरिकेला काहीही कारण नव्हते. खामेनी यांची राजवट दमनकारी आहे असे मानले तरी तो त्या देशाचा अंतर्गत प्रश्न होता व आहे .तो त्या देशातील जनतेने सोडवायला हवा. तिथे अमेरिकेने घुसायचा काहीही संबंध नाही. ट्रम्प आणि त्यांचे पाठीराखे आपापल्या देशात लोकशाहीचे धिंडवडे काढत असतात. मात्र अशी घुसखोरी लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी करत आहोत असा आव आणतात. ही त्यांची गुंडगिरी व दहशतवाद रोखता येत नाही हा खरा आजचा प्रश्न आहे.

 

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा त्यांच्या देशात घुसून खून करणे या विकृत मानसिकतेचे व कारवाईचे जगातील कोणताही लोकशाही देश समर्थन करू शकत नाही. कारण या कारवाईचे समर्थन करणे हे जागतिक हुकूमशाहीला शरण जाण्यासारखे आहे. म्हणूनच नाटो मधील एकाही देशाने अमेरिकेला बरोबर ठरवलेले नाही. फ्रान्सने तर अमेरिका विरोधी भूमिका घेतली. इंग्लंड ही यापासून अलिप्त राहताना दिसत आहे. पेनने सुद्धा हा इराणच्या स्वायत्तेवर झाला आहे असे म्हटले आहे.चीन आणि रशियाने या युद्धाचा आणि अमेरिकेच्या साम्राज्यवादी धोरणाचा तीव्र निषेध केला आहे. एकीकडे रशिया -युक्रेन युद्ध चार वर्षाहून अधिक काळ सुरू आहे. त्यात आता हे इराण विरुद्ध अमेरिका,इस्त्राईल युद्ध सुरू झाले आहे. त्याचे गंभीर परिणाम जागतिक अर्थकारणावर, राजकारणावर,समाजकारणावर होणार आहेत. एकूण ही तेलात आग आणि आगीत तेल आहे. अर्थातच याचे गंभीर परिणाम भारतावरही होणार आहेत. त्यातून बाहेर पडायला ट्रम्प किंवा नेत्यांनाहू मदत करणार नाही हेही स्पष्ट आहे.

इराणवरील अशा कारवाईने इराण लगेच शरण येईल असे वाटत नाही.इराण हा देश ही तसा आक्रमक देश आहे. अमेरिका व इजराइल प्रमाणे तोही काही दहशतवादी संघटनांना मदत करत आलेला आहे.

इजरायल व अमेरिकेच्या तुलनेत इराणची युद्धशक्ती कमी आहे हे नक्कीच.पण तरीही इराणने अमेरिकेच्या पाठीराख्या देशांवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केलेला आहे. यातील अनेक देश तेलसंपन्न आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग बंद केला गेल्याने तेल पुरवठ्याचा गंभीर प्रश्न तयार होतो आहे. इराणची भूमिका आता या आगीत केवळ आम्हीच होरपळणार नाही तर इतरांनाही होरपळायला लावू अशी दिसते आहे. त्यामुळे या युद्धाची व्याप्ती वाढत आहे. त्याचा मोठा परिणाम जगावर होणार आहे.

अमेरिका आणि इजरायल यांनी लादलेल्या या युद्धावर भारताची सावध मौनी भूमिका आपल्या पारंपारिक, नैतिक , राष्ट्रीय अलिप्तता धोरणापासून बाजूला जाणारी आहे. खामेनी यांची त्यांच्या घरात घुसून केलेली हत्या ही निषेधार्ह आहे. हे आपण राष्ट्र म्हणून ठामपणे सांगू शकत नाही यातच आपल्या विश्वगुरुत्वाचा बुडबुडा फुटलेला आहे. हे गुरुत्व भक्तुल्याचे स्वयंघोषित आहे.विश्वाशी त्याचा काहीही संबंध नाही.हे यापूर्वी पाकिस्तानच्या कारवाईसह अनेकवेळा सिद्ध झालेले आहेच. आखाती देशामध्ये जवळजवळ एक कोटी भारतीय लोक काम करत आहेत हे खरे आहे. पण ते कारण पुढे करून आपली अलिप्ततावादी भूमिका सोडणे हे राजकीय मुत्सद्देगिरीचे लक्षण नाही. देशांतर्गत राजकारणात अशांततेची परिस्थिती तयार करून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेणारे आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी अबोल शांततेची भूमिका घेतात त्यावेळी त्या शांततेला वास्तवापेक्षा आगतिकतेची झालर मोठी असते. पण १४५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या धोरणकर्त्यांची अशी आगतिकता परराष्ट्र व्यवहारात तत्त्वांची, मूल्यांची सोडचिठ्ठी ठरत असते.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली सदतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.)


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!