वही-पेन गेलं, आता टॅब आला! पुण्याच्या गल्लीगल्लीत घुमणार जनगणनेचा डिजिटल चौघडा!
“पुणे तिथे काय उणे?” असं आपण अभिमानाने म्हणतो, पण आता या पुण्यात कोणाकडे ‘काय उणे’ आहे आणि कोणाकडे ‘काय जास्त’ आहे, याचा हिशोब मांडायला सरकारचे पाईक तुमच्या उंबरठ्यावर येणार आहेत! गेल्या काही वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा होती, त्या ‘महाजनगणनेचा’ शंख अखेर पुण्याच्या भूमीत फुंकला गेला आहे. आगामी १ मे ते १५ जून या रणरणत्या उन्हात, जेव्हा पुणेकर दुपारची वामकुक्षी घेण्याच्या तयारी असतील, तेव्हाच जनगणनेचे प्रगणक तुमच्या घराची कडी वाजवणार आहेत.
यंदा ‘पाटी-पेन्सिल’ नाही, थेट ‘डिजिटल’ स्वारी!
अहो, काळ बदलला तशी जनगणनेची तऱ्हाही बदलली! आता तो जुना काळ गेला, जेव्हा एखादा कारकून जाडजूड वही काखेत मारून यायचा आणि शाईच्या पेनाने तुमची माहिती खरडायचा. यंदा भारत सरकारने ‘डिजिटल’ अस्त्र उगारलं आहे. सगळं काही ‘मोबाईल’वर, ‘टॅब’वर! म्हणजे माहिती अशी काही झटकन दिल्लीला पोहोचणार की विचारू नका. पुणे महापालिकेचे १५ क्षेत्रीय कार्यालयांचे शिलेदार या कामासाठी कंबर कसून तयार झाले आहेत. ३ फेब्रुवारीला महापालिकेत जी बैठक झाली, ती पाहता असं वाटतंय की प्रशासनाने आता ‘आर या पार’ची लढाई पुकारली आहे!
घराघरांचा हिशोब अन् कारभाऱ्यांचा रुबाब
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी तर अधिकाऱ्यांना स्पष्टच सुनावलंय – “वेळेत काम झालं पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे!” १५ ‘चार्ज’ अधिकारी आणि शहर जनगणना अधिकाऱ्यांना आता टाचण्या टोचल्या गेल्या आहेत. घरांची यादी तयार करणे आणि घरांची गणना करणे हा या मोहिमेचा पहिला टप्पा आहे. १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हा जनगणनेचा ‘सोहळा’ सुरू होईल तो थेट १५ जूनपर्यंत. म्हणजे उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जाण्यापूर्वी आपल्या घराची नोंद झाली की नाही, याची खातरजमा पुणेकरांना करावीच लागणार!
पुणेकरांनो, सावधान!
पुणेकर म्हणजे चौकस आणि तसाच थोडा खोचकही! प्रगणक दारात आला की “कुठून आलात?”, “काय अधिकृत ओळखपत्र आहे का?”, “माझी माहिती सुरक्षित राहील का?” असले जहाल प्रश्न विचारण्यात पुणेकर माहीर आहेत. पण यंदा डिजिटल पद्धत असल्याने माहिती ‘अचूक, जलद आणि पारदर्शक’ राहणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे तुमचं घर, तुमची मालमत्ता आणि तुमचा डेटा आता सरकारच्या ‘मेमरी कार्ड’मध्ये कायमचा फिट होणार आहे.
आमचा कट्टा : “लोकसंख्या वाढतेय म्हणून ओरडण्यापेक्षा, ती किती वाढली आहे हे एकदा ‘डिजिटल’ आकड्यांत बघायला काय हरकत आहे? पुण्याच्या गल्ल्यागल्ल्यांत आता जनगणनेचा हा ‘डिजिटल’ ववारा सुटणार आहे. फक्त प्रगणक दादांनो, दुपारी १ ते ४ या वेळेत पुणेकरांच्या दारावरची बेल वाजवताना थोडी ‘सभ्यता’ पाळा, नाहीतर जनगणनेऐजी ‘जंग-गणना’ व्हायची!”






























