पनवेलच्या ‘उरण नाक्या’वर गुटखासम्राटांचे दात घशात; खाकी वर्दीचा कडाका, सव्वा लाखाचा विषारी फन्ना जप्त!
सुनिल पाटील : खालापूर
पनवेल: निवडणुकीचे वारे वाहू लागले की, सापा-विंचवाप्रमाणे हे तस्कर बिळातून बाहेर येतात! पण पनवेलच्या पोलिसांनी या ‘विखारी’ नागनाथांच्या फणा चांगल्याच ठेचल्या आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असताना, शहरात शांतता राहावी म्हणून पोलिसांनी ‘ऑलआऊट ऑपरेशन’ सुरू केले आहे. याच मोहिमेत मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी उरण नाक्यावर सापळा लावून सव्वा लाख रुपयांच्या गुटख्याचा ‘चक्काचूर’ केला!
रात्रीचा खेळ, पोलिसांचा मेळ! मध्यरात्रीची वेळ..
रस्ते सामसूम असताना एक कार (जिचा वापर लोक फिरण्यासाठी करतात, पण हे महाभाग तस्करीसाठी करत होते) पनवेलकडून करंजाडेच्या दिशेने मोठ्या थाटात चालली होती. पण समोर पोलिसांची ‘नाकाबंदी’ पाहून चालकाचा थरकाप उडाला. पोलिसांनी गाडी अडवली आणि झडती सुरू केली, तर काय? गाडीच्या मागच्या सीटवर ‘रजनीगंधा’चा सुवास दरवळत होता आणि डिक्कीत ‘बाजीराव’ सुगंधी पानमसाल्याच्या गोण्यांचा खच पडला होता!
तुलसी अन् मस्तानीची ही कसली ‘केमिस्ट्री’?
या कारमध्ये ७ गोण्यांमध्ये भरलेला बाजीराव मसाला, तुलसी रॉयल जाफरानी जर्दा आणि मस्तानी च्युइंग टोबॅको असा तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मनीष गोविंद कुमार आणि संदीप ऊर्फ संजू निशाद या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांचे थोबाड रंगवले आहे. “विक्रीसाठी चाललो होतो,” अशी कबुली या दोघांनी दिली असली, तरी यांच्यामागचा खरा ‘सुत्रधार’ कोण? हे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.
गुटखावाल्यांना आता ‘मकोका’चा दणका..
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही माहिती दिली आहे की, गुटखा विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी आता ‘मकोका’ लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जे लोक पैशांच्या हव्यासापोटी लोकांच्या आयुष्याशी खेळत आहेत, त्यांचे आता दिवस भरले आहेत असेच समजावे!
पनवेल पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत. निवडणूक काळात गुटख्याचा ‘पीक’ येऊ पाहणाऱ्यांचे पोलिसांनी पार वाटोळे केले आहे. आता पाहायचे हेच की, या तस्करांच्या टोळ्यांचे मूळ मालक कोण आहेत आणि पोलीस त्यांना कधी जेरबंद करतात!


























