खालापूर हादरले: निगडोलीत निवृत्त बँक कर्मचाऱ्यासह पत्नीची हत्या; तपासासाठी पोलिसांची पथके रवाना


 खालापूर हादरले: निगडोलीत निवृत्त बँक कर्मचाऱ्यासह पत्नीची हत्या; तपासासाठी पोलिसांची पथके रवाना

खालापूर : सुनिल पाटील :

खालापूर तालुक्यातील निगडोली येथे एका घरात वृद्ध दांपत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. रघुनाथ दत्तू फराट (वय ७५) आणि सुरेखा रघुनाथ फराट (वय ७२) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, धारदार शस्त्राने वार करून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले असून खालापूर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

रघुनाथ फराट हे बँकेतून सेवानिवृत्त झाले होते आणि पत्नीसह निगडोली येथे राहत होते. त्यांची मुले खोपोली आणि खालापूर भागात वास्तव्यास आहेत. मंगळवारी दिवसभर रघुनाथ फराट यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने, त्यांच्या मुलाने काळजीपोटी नातू आदित्य फराट याला घरी पाठवले. आदित्यने घरात प्रवेश केला असता, त्याला आजी-आजोबांचे मृतदेह आढळून आले. त्याने तात्काळ या घटनेची माहिती गावकऱ्यांना आणि पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याची उकल करण्यासाठी आणि महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम तसेच श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. मृतदेहांची विटंबना करण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही प्राथमिक तपासात दिसून येत आहे. ही घटना घरफोडीच्या उद्देशाने घडली की यामागे पूर्ववैमनस्य आहे, या दोन्ही शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस लवकरच आरोपींचा शोध घेतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!