कोंढव्याची ‘कोंडी’ की लोकप्रतिनिधींची ‘धोंडी’? जनतेचा सवाल : दहा वर्ष काय केवळ नारळच फोडले?
पुण्यातल्या कोंढव्याची अवस्था सध्या कशी आहे..? तर, ‘घर असावे घरासारखे, पण बाहेर रस्ते असावे फक्त नावालाच!’ अशी झाली आहे. कोंढव्याच्या रस्त्यांवरून गाडी चालवणे म्हणजे मरणाशी झुंज देण्यासारखे झाले असून, येथील ट्रॅफिकचा विळखा म्हणजे जिवंतपणी नरकातल्या यातनाच आहेत. गेली दहा वर्षे ज्यांनी सत्तेच्या खुर्च्या उबवल्या, त्या लोकप्रतिनिधींना आता नागरिक भर चौकात विचारत आहेत— “अरे, दहा वर्ष काय फक्त नारळ फोडण्याचेच उद्योग केलेत की जनतेसाठी काही कामही केलेत?”
अरे, ही रस्ते आहेत की अडथळ्यांची शर्यत..?
सकाळ झाली की कोंढवा चौक, कौसरबाग आणि NIBM रोडवर वाहनांचा असा काही ‘कुंभमेळा’ भरतो की, तिथे माणूस चालतोय की रांगतोय, हेच समजत नाही. रुग्णवाहिका सायरन वाजवून थकते, पण रस्ता मोकळा होत नाही. जणू काही येथील प्रशासनाला आणि नेत्यांना माणुसकीशी काही देणेघेणेच उरलेले नाही. शाळा-कॉलेजची मुले आणि नोकरीनिमित्त बाहेर पडणारे नागरिक यांच्या आयुष्यातील लाखो तास या ट्रॅफिकच्या धुराड्यात जळून खाक होत आहेत. आणि आमचे नगरसेवक? ते बहुधा ‘विकासाच्या’ अशा काही स्वप्नात गुंग आहेत की त्यांना रस्त्यावरचे अतिक्रमण आणि वाहनांच्या रांगा दिसेनाशा झाल्या आहेत!
दहा वर्षांचा हिशोब द्या, मगच मत मागा..!
कोंढवेकरांचा संताप आता उफाळून आला आहे. रस्ते रुंदीकरण कागदावरच, अतिक्रमण जैसे थे, आणि पार्किंगची तर नावानं बोंब! वारंवार मागण्या करूनही जर बदल होत नसेल, तर मग हे लोकप्रतिनिधी नक्की कोणासाठी काम करत आहेत? “सत्ताधाऱ्यांनी केवळ आश्वासनांची गाजरे वाटली,” असा जळजळीत आरोप आता प्रत्येक नाक्यावर ऐकू येत आहे. जनतेने आता ठाम ठरवले आहे—ज्यांना दहा वर्षात एक ट्रॅफिकची समस्या सोडवता आली नाही, त्यांना पुन्हा त्याच खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही.
आता ‘जुने’ गेले, ‘नवे’ हवेत..!
कोंढव्यातील जनतेने आता कंबर कसली आहे. “खोट्या आश्वासनांचे डोस पाजणारे जुने चेहरे नकोत, तर प्रत्यक्ष धाडसाने काम करणारे नवीन हात हवेत,” अशी गर्जना आता घराघरातून ऐकू येत आहे. जुने प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरले असून, आता सक्षम आणि संवेदनशील नेतृत्वाकडे लोक आशेने पाहत आहेत. आगामी निवडणुकीत सध्याच्या प्रस्थापितांना घरचा रस्ता दाखवून ‘नवीन चेहऱ्यांकडे’ सत्तेची चावी सोपवण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.
सावधान! मतदारांचा तिसरा डोळा उघडलाय!
हा केवळ संताप नाही, तर हा जनक्षोभ आहे. सत्तेच्या उबेत सुस्त राहिलेल्या आणि केवळ नारळ फोडण्यात धन्यता मानणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोंढव्याच्या जनतेने दिलेला हा ‘शाब्दिक सणसणीत टोला’ आहे. लक्षात ठेवा, ज्यांना जनतेचा रस्ता मोकळा करता आला नाही, त्यांचा सत्तेचा रस्ता नागरिक आता कायमचा बंद करतील!
बघूया, आता ही ‘कोंडी’ सुटते की नगरसेवकांची ‘धोंडी’ त्यांच्याच अंगावर उलटते!































