माधुरीचा विरह आणि एफआरपीचा लढा: राजू शेट्टींची तोफ धडाडली, शिरोळात विरोधकांची दाणादाण !

शिरोळ, अहो, राजकारण म्हणजे काय पोरखेळ झालाय का? आणि स्वाभिमान म्हणजे काय साखरेच्या पोत्यात दडवून ठेवलेली वस्तू आहे? शिरोळच्या रणधुमाळीत आज स्वाभिमानी वाघ राजू शेट्टी यांनी जी गर्जना केली आहे, ती ऐकून गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे ‘पांढरपेशी’ गडी हादरले नसतील तरच नवल!
‘माधुरी’ गेली की पळवली..?
शेट्टींनी आज थेट मर्मावरच बोट ठेवलंय. ती नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण! अहो, ती काय नुसती हत्तीण होती? तो तर कोल्हापूरच्या अस्मितेचा चालता-बोलता पर्वत होता. पण वाघ वाड्याबाहेर असला की कोल्हेकुई वाढते, हेच खरं! राजू शेट्टी डोळ्यात तेल घालून सभागृहात असते, तर त्या अंबानी काय, कुणाची बापाची पेंड होती की माधुरीला हात लावेल? “मी नव्हतो म्हणून त्यांनी कायद्याचा आडोसा घेतला,” हे शेट्टींचे शब्द म्हणजे सत्तेत बसलेल्यांच्या नाकर्तेपणावर ओढलेले आसूडच आहेत. पण काळजी नसावी, वाघ जागा झालाय आणि माधुरीला परत आणल्याशिवाय हा गडी शांत बसणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे!
एफआरपीचे तुकडे करणाऱ्यांची खाटीकखाना वृत्ती! शेतकऱ्यांच्या घामाचा हिशोब करताना ज्यांना फुटकी कवडी फेकायची सवय लागली आहे, त्यांना शेट्टींनी आरसा दाखवलाय. २०१३ साली संसदेत एकरकमी एफआरपीचा कायदा आणणारा हाच माणूस! पण इथल्या सरकारने काय केलं? शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा घाट घातला. वा रे पठ्ठे! शेतकऱ्याच्या रक्ताचा पाणी करून पिकवलेल्या उसाचे तुकडे करायला निघाले होते हे ‘कारखानदारधार्जिणे’ सरकार! पण हायकोर्टात खेचून या तुकडेबाजांची अक्कल ठिकाण्यावर आणली ती शेट्टींनीच.
आवाहन की निर्वाणीचा इशारा..?
शेट्टींनी आता शिरोळच्या जनतेला साद घातली आहे. ही निवडणूक साधीसुधी नाही, हा भविष्याचा लढा आहे. ज्यांना जनतेचे प्रश्न सभागृहात ‘ताकतीने’ मांडता येतात, त्यांनाच निवडून द्या. अन्यथा अन्याय सहन करण्याची सवय लावून घ्या, असा रोखठोक इशाराच त्यांनी दिलाय.
निवडणुकीचा मंत्र सोपा आहे : रिक्षा सुसाट धावली पाहिजे..!
हात बळकट झाला पाहिजे!
मशाल धगधगली पाहिजे!
महाविकास आघाडीच्या या त्रिसूत्रीला विजयी करा आणि लढणाऱ्यांच्या हाताला बळ द्या, असं आवाहन करताना शेट्टींचा आवाज शिरोळच्या मातीत घुमत होता. आता जनता जनार्दन काय करणार? गप्प बसून अन्याय गिळणार की ‘बदला’ घेणार? बघूया, मतपेटी काय बोलतेय ते!



























