तारदाळात महायुतीची ‘तोफ’ धडाडली; विरोधकांच्या पोकळ उपोषणाचे धिंडवडे!

खासदार, आमदारांच्या विकासकामांचा झंझावात; सानिका आवाडे, प्रियांका खोबरे आणि सनी ओऊळकर यांच्या विजयाचा निर्धार

तारदाळ: निवडणुकीचे रणांगण तापले की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात, पण तारदाळच्या मातीत आज विकासाचा हुंकार आणि महायुतीचा जयघोष ऐकायला मिळाला! निमित्त होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्त आयोजित महायुतीच्या जाहीर सभेचे. कोरोची मतदारसंघातील भाजपा-महायुतीच्या उमेदवार कु. सानिका राहुल आवाडे, सुमेध (सनी) ओऊळकर आणि प्रियांका प्रवीण खोबरे यांच्या प्रचारासाठी जमलेला जनसमुदाय पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली नसेल तरच नवल!
विकासाची गंगा आणि ‘क्रेडिट’चे राजकारण
सभेची सुरुवातच मुळी माजी भारत निर्माण सचिव सचिन पवार यांच्या फटकेबाजीने झाली. पवार यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात विरोधकांचे अक्षरशः वाभाडे काढले. “गावात ४-५ दिवसांनी पाणी येते, हे काही उपोषणाचे फळ नाही, तर आमदार राहुल आवाडे आणि प्रसाद खोबरे यांनी ५२ कोटींच्या जलजीवन योजनेसाठी झिजवलेल्या चपलांचे आणि केलेल्या पाठपुराव्याचे फळ आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या ‘उपोषणी’ स्टंटचा समाचार घेतला. रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सुविधांसाठी आवाडे आणि हाळवणकर यांनी जे योगदान दिले, ते तारदाळची जनता विसरणे शक्य नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्त्री शक्तीचा जागर : सानिका आवाडे आणि प्रियांका खोबरेंचा एल्गार
कु. सानिका आवाडे यांनी आपल्या भाषणात केवळ विकासाचा पाढा वाचला नाही, तर महिला सक्षमीकरणाचा नवा ‘रोडमॅप’ मांडला. “आम्हाला केवळ मते नकोत, तर बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम आणि सन्मान हवा आहे,” असे सांगत त्यांनी महिलांच्या मनात घर केले.
तर तारदाळ पंचायत समितीच्या उमेदवार सौ. प्रियांका खोबरे यांनी तर रणरागिणीचा अवतार धारण केला होता. “राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले महाराणी ताराराणी आणि माता रमाई अहिल्यादेवींचा वारसा घेऊन मी मैदानात उतरले आहे,” असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. शाळा, अंगणवाडी आणि शेतीचे प्रश्न सोडवून हा मतदारसंघ ‘डिजिटल’ आणि ‘स्मार्ट’ करण्याचा त्यांचा संकल्प मतदारांना भावला.
‘लाडकी बहीण’ योजना कधीही बंद होणार नाही: चंद्रकांत दादांचा निर्वाळा
सभेचे मुख्य आकर्षण ठरले ते नामदार चंद्रकांत दादा पाटील! दादांनी आपल्या खास शैलीत मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. “विरोधक कितीही ओरडले तरी ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही! देशातील ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे स्वप्न मोदीजींचे आहे,” असे सांगत त्यांनी केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारची ताकद दाखवून दिली. भारताला महासत्ता बनवण्यासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सभेची वैशिष्ट्ये:
हजेरी: आमदार राहुल आवाडे, प्रसाद खोबरे, जयप्रकाश भगत यांच्यासह मान्यवरांची मोठी मांदियाळी.
आकर्षण: महिलांचा अथांग जनसमुदाय आणि ‘महायुती’च्या विजयाचा एकच जल्लोष.
चर्चा: ५२ कोटींच्या पाणी योजनेचे श्रेय लाटणाऱ्या विरोधकांची झालेली ‘हवा’ गुल!
थोडक्यात सांगायचे तर, तारदाळची ही सभा म्हणजे केवळ प्रचाराचा नारळ नव्हता, तर विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा फोडणारा महाविजयाचा शंखनादच होता!



























