नन्ही परी, मोठी भरारी! सांगलीच्या तीन महिन्यांच्या ‘जिजा’चा जागतिक विक्रम !!


नन्ही परी, मोठी भरारी ! सांगलीच्या तीन महिन्यांच्या ‘जिजा’चा जागतिक विक्रम !!

सांगली : अशोक मासाळ :

आजचा जमाना कसला, तर म्हणे स्पर्धीचा! जन्माला आल्या आल्या पोराने कुठल्या क्लासला जायचं, याचीच चिंता पालकांना लागलेली असते. पण याच धावपळीच्या युगात, ईश्वरी कृपेचा आणि मानवी कौशल्याचा एक अजब चमत्कार सांगलीच्या भूमीत पाहायला मिळाला आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या एका चिमुकलीने जे करून दाखवलंय, ते पाहून भलेभले तोंडात बोट घालतील. सांगलीची ही ‘जिजा’ नावाची नन्ही परी जागतिक पातळीवर “सुपर टॅलेंटेड किड” म्हणून चमकली आहे!

ऋतुजा आणि प्रतिक विचारे यांच्या पोटी ५ डिसेंबर २०२५ रोजी जन्मलेल्या या जिजाने वयाची चार महिनेही पूर्ण करायच्या आत ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नाव कोरले. अहो, सामान्यपणे ज्या वयात बाळं नुसती डोळे मिचकावून जगाकडे पाहत असतात, त्या वयात जिजाने ‘टम्मी रोलिंग’ (उताणे पडणे) सुरू केले. तिची वस्तू पकडण्याची ताकद, आवाजाला देणारा प्रतिसाद आणि सर्वात मुख्य म्हणजे तिची संगीताची जाण थक्क करणारी आहे. जेव्हा ती पियानोच्या सुरांशी खेळते, तेव्हा जणू एखादा पूर्वजन्मीचा सिद्ध कलाकारच तिच्या रूपाने अवतरलाय की काय, असा भास होतो. स्वतःच्या हाताने दुधाची बाटली पकडणे काय किंवा आधाराने उभे राहण्याचा प्रयत्न करणे काय, तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच चपळता जाणवते.

३१ मार्च २०२६ रोजी तिच्या या विलक्षण गुणांची अधिकृत नोंद जागतिक स्तरावर झाली आणि सांगलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेऊन मिरज संस्थानचे युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज आणि युवराणी श्रीमंत अनुसयाराजे पटवर्धन यांनी जिजाची सदिच्छा भेट घेतली. देवी भवन पॅलेस येथे झालेल्या एका छोटेखानी पण देखण्या सोहळ्यात या चिमुकलीला पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आणि भारत टेक्निकल इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष राकेश तामगवे सरांनीही जिजाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

“जिजाच्या या यशामुळे आमचा आनंद तर गगनात मावेनासा झालाच आहे, पण त्याचसोबत एका गुणी अपत्याला घडवण्याची मोठी जबाबदारीही आमच्यावर आली आहे,” अशी अत्यंत विनम्र भावना तिच्या माता-पित्यांनी व्यक्त केली.

चिमुकल्या वयात एवढी मोठी झेप घेणाऱ्या या जिजाचे कौतुक करावे तितके थोडेच! आज संपूर्ण सांगली जिल्हा या लाडक्या लेकीच्या कौतुकाचा सोहळा साजरा करत आहे. तिच्या या यशाने महाराष्ट्राच्या वैभवात नक्कीच भर पडली आहे. या बालमूर्तीला आणि तिच्या सुजाण पालकांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!