भोंदू गोरक्षकांची दुकानदारी बंद करा आणि गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करा !


पुण्यात मुस्लिम समाजाचा सरकारला रोखठोक सवाल; गो-रक्षणाच्या नावाखालील रक्ताचा खेळ तात्काळ थांबवण्याची मागणी !

पुणे, ज्या देशामध्ये गाईला केवळ एक चतुष्पाद प्राणी न मानता, माता म्हणून पुजले जाते, त्याच देशामध्ये आज तिच्याच नावावर निष्पाप माणसांचे रक्त सांडवले जावे, यासारखा दुसरा क्रूर दैवदुर्विलास नाही! गो-रक्षणाचा मुखवटा घालून फिरणाऱ्या काही समाजकंटकांकडून होणारी ‘मॉब लिंचिंग’ (जमावाकडून होणारी हिंसा) आणि त्याआड चालणारे द्वेषाचे घाणेरडे राजकारण आता कुठेतरी कायमचे थांबले पाहिजे. जर गो-रक्षण हाच देशाचा प्राधान्यक्रम असेल, तर केंद्र सरकारने तात्काळ गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करावे, म्हणजे दुकांदारी चालवणाऱ्या भोंदू गोरक्षकांचे धंदे कायमचे बंद होतील, असा संतप्त आणि तितकाच कायदेशीर तडाखा आज पुण्यातून ‘मूलनिवासी मुस्लिम मंचा’च्या वतीने सरकारला देण्यात आला.

देशातील सामाजिक सलोखा आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी मंचाच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना एक सविस्तर आणि विचार करायला लावणारे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनातून मंचाने केवळ अल्पसंख्याकांच्या भावना मांडल्या नाहीत, तर बहुसंख्याकांच्या श्रद्धेचा सन्मान ठेवून देशातील कायदा व सुव्यवस्थेला लागलेली हिंसेची वाळवी उपसून टाकण्याचे आवाहन केले आहे.

आचार्य अत्रे यांच्या भाषेत सांगायचे तर, ‘तोंडात गोड बोलून आणि हातात काठ्या घेऊन’ फिरणाऱ्यांमुळे देशाचे वातावरण गढूळ होत आहे. मंचाने आपल्या निवेदनात अत्यंत मर्मभेदी प्रश्न उपस्थित केला आहे की, जर देशातील करोडो जनतेची गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याची सुप्त इच्छा आहे, तर मग केंद्र सरकारला हा ऐतिहासिक निर्णय घेण्यापासून कोणती अदृश्य राजकीय अडचण रोखत आहे? गाईला जर अधिकृतपणे ‘राष्ट्रीय प्राणी’ म्हणून घोषित केले, तर तिचे रक्षण करण्याची आणि तिचा आदर राखण्याची संपूर्ण जबाबदारी खाजगी टोळ्यांऐवजी शासकीय यंत्रणेकडे येईल. परिणामी, रस्त्यावर उतरून कायदा हातात घेणाऱ्या झुंडशाहीला चाप बसेल आणि संशयावरून निष्पाप लोकांचे जीव घेण्याचे क्रूर प्रकार थांबतील, असा विश्वास मंचाने व्यक्त केला आहे.

धर्म कोणताही असो, माणसाचा जीव सर्वोच्च असतो, अशी स्पष्ट आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारी भूमिका यावेळी उपस्थित नागरिकांनी मांडली. गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळाल्यास तिचा योग्य सन्मान होऊन कायदेशीर रक्षण होईल. तसेच गोरक्षणाच्या नावाखाली अखंड भिती आणि दहशत माजवून स्वतःचे खिसे भरणार्या समाजकंटकांचा बंदोबस्त होईल. यामुळे गो-हत्येच्या संशयावरून होणाऱ्या निष्पाप हत्या थांबतील आणि धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळ्या भाजणाऱ्यांचे मनसुबे उधळले जातील, असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला. आम्हांला या देशामध्ये केवळ आणि केवळ शांतता, सलोखा आणि बंधुभाव हवा आहे, अशी आग्रही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

‘मूलनिवासी मुस्लिम मंच’ संघटनेचे अध्यक्ष अंजुम इनामदार आणि ‘जमियत उलेमा हिंद’चे हाफिज किफायतुल्लाह यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. या प्रसंगी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन, जमियत उलेमा हिंद पुणेचे कारी मुबशीर, सोहेल खान, सामाजिक कार्यकर्त्या शाहीन सिंदगी, ख्रिश्चन समाजाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजन नायक, विष्णू गरुड, जाहिद शेख,े महबूब नदाफ, हशीम शेख, इब्राहिम यवतमाळवाला, मोईनुद्दीन शेख, नदीम मेमन आणि सलीम मौला पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील विचारवंत व धर्मगुरू उपस्थित होते.

सध्याच्या गढूळ राजकीय वातावरणात पुण्यातून मुस्लिम समाजाने घेतलेली ही भूमिका देशातील एकात्मतेला बळ देणारी आणि ढोंगी राजकारण्यांचे डोळे उघडणारी ठरेल, यात शंका नाही


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!