शब्दांचा बाजार नाही, तर रक्ताचे नाते ; कोंढवा-कौसरबागचा कौल फक्त निष्ठेच्या बाजूने!
– प्रेस मीडिया लाईव्ह :
“नमस्कार…
राजकारणाच्या या बाजारबुणग्यांच्या जत्रेत जिथे निष्ठा लिलावात निघतात आणि तत्त्वे वेशीवर टांगली जातात, तिथे कोंढव्याच्या भूमीत आज एक वेगळाच चमत्कार पाहायला मिळतोय. निवडणूक आली की बेडूक फुगावा तसे नेते फुगतात, घोषणांचे ढोल वाजतात आणि आश्वासनांचे पाऊस पडतात. पण कोंढवा-कौसरबाग प्रभाग १९ च्या आखाड्यात यावेळची लढाई खुर्चीची नाही, तर ती एका ‘वारशाची’ आणि ‘विश्वासाची’ आहे!
सध्या बाजारात नवीन ‘राजकीय सल्लागार’ अवतरले आहेत. हे कसले सल्लागार? हे तर लोकशाहीचे कसाई आहेत! इथे ‘खात्रीने कामे केली जातात’ आणि त्याहून भयंकर म्हणजे ‘खरेदी-विक्रीचे व्यवहार’ उघडपणे पार पाडले जातात. ‘तुमच्या आवडीनुसार पक्ष बदलून मिळतील’ असे बोर्ड लावायचेच फक्त बाकी राहिले आहेत. पैशाच्या जोरावर सकाळी एका पक्षात असलेला नेता संध्याकाळी दुसऱ्या शालूत नटून उभा राहतो. या खोकेबाज संस्कृतीमुळेच आज सामान्य जनतेच्या विकासाला खीळ बसली आहे!
हसन शेख : एक देवमाणूस!
लोकहो, पैलवान हसन शेख हे नाव काही नुसते निवडणुकीच्या पत्रिकेवरचे नाव नव्हते. तो एक आधार होता. गरिबांच्या घराला आलेली अवकळा असो किंवा व्यापाऱ्यांच्या गळ्याला पडलेला प्रशासकीय फास असो, हसन शेख तिथे ढाल बनून उभा राहायचा. त्यांनी कधी सत्तेसाठी लाचारी केली नाही की पैशासाठी पक्ष बदलण्याचा बाजार मांडला नाही. ज्याने लोकांच्या डोळ्यांतील पाणी पुसले, त्याच्यासाठी लोकांनी आज आनंदाश्रू सांडावेत, हाच तर निसर्गाचा आणि लोकशाहीचा न्याय आहे!
वारसा कर्तृत्वाचा, केवळ रक्ताचा नाही..
आज मैदानात तस्लिम हसन शेख आणि तरुण तडफदार मोहसीन शेख उतरले आहेत. वारसा हक्काने गाद्या मिळतात, पण लोकांची मने मिळवण्यासाठी काळजाचे पाणी करावे लागते. कमेला बिल्डिंगच्या त्या सभेत जेव्हा मोहसीन शेख यांचा कंठ दाटून आला, तेव्हा तो केवळ एका मुलाचा शोक नव्हता, तर तो वडिलांच्या कष्टांची जाणीव असलेला एका कृतज्ञ पुत्राचा हुंकार होता.
आमच्या राजकारणात सध्या ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ आणि ‘खोके संस्कृती’चे पीक आले आहे. पण इथे मोहसीन शेख ताठ मानेने सांगतोय, “मला वडिलांचे दुःख विकून सत्ता नकोय!” शाब्बास पठ्ठ्या! राजकारणात एवढी नैतिकता शिल्लक आहे, विकणारे अनेक पाहिले, पण तत्वासाठी उभे राहणारे तुमच्यासारखे विरळ
व्यापाऱ्यांची वज्रमुठ…
पुणे अल कुरेश व्यापारी संघटनेने दिलेला पाठिंबा म्हणजे हसन शेख नावाच्या ‘क्रेडिट नोट’वर समाजाने मारलेला शिक्का आहे. जो संकटकाळी धावून आला, त्याच्याच मागे हा समाज उभा राहतो. ही निवडणूक म्हणजे केवळ मतांची बेरीज-वजाबाकी नाही; हे तर माणुसकीचे गणित आहे.
अखेरचा तडाख…!
विरोधकांनो, तुमची कारस्थाने, तुमचे खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि तुमचे झगमगाट इथे फिके पडणार आहेत. कारण समोर ‘सेवेचा वारसा’ उभा आहे. तस्लिम शेख यांच्या रूपाने एक आई आणि मोहसीन शेख यांच्या रूपाने एक लढवय्या युवक जेव्हा मैदानात येतो, तेव्हा जनताच त्यांची सेनापती होते.




























