स्मार्ट सिटीचा शोध अन् टक्केवारीचा बोध; काँग्रेसच्या तोफेने भाजपचा बालेकिल्ला हादरला!


स्मार्ट सिटीचा शोध अन् टक्केवारीचा बोध; काँग्रेसच्या तोफेने भाजपचा बालेकिल्ला हादरला!:

पुणे ही विद्येची आणि कलेची नगरी, पण सध्या येथे विकासाचा ‘स्मार्ट’ खेळ खंडोबा सुरू आहे. ज्या शहराने देशाला विचार दिला, त्या पुण्यात आज ‘टक्केवारी’ आणि ‘खोक्यांचे’ राजकारण फोफावले आहे, असा जळजळीत पंचनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुकुंदनगरच्या सभेत केला. भाजपच्या पोकळ आश्वासनांची लक्तरे वेशीवर टांगताना सपकाळ यांची तोफ अशी काही धडाडली की, महायुतीच्या नेत्यांची झोप उडाली असेल!

दुर्बिण घेऊन शोधा स्मार्ट सिटी!

“देशात शंभर स्मार्ट सिटी होतील, अशा गप्पा मारणाऱ्यां..नी पुण्याचे काय केले?” असा सवाल करत सपकाळ म्हणाले की, आज स्मार्ट सिटी शोधण्यासाठी दुर्बिण घेऊन फिरावे लागतेय. भाजपचे नेते शहराच्या विकासाऐवजी इमारतींचा पुनर्विकास आणि त्यातून मिळणाऱ्या टक्केवारीच्या गणितातच गुंतले आहेत. ज्या पक्षाने अटलजींचे आदर्श गुंडाळून ठेवले, त्यांच्या हाती शहराचे भविष्य देणे म्हणजे कोल्ह्याला द्राक्षाच्या मळ्याचे रक्षण करायला सांगण्यासारखे आहे!

‘देवा भाऊ’ की ‘मेवा भाऊ’?

राज्यात सध्या सुरू असलेल्या सवंग लोकप्रियतेच्या राजकारणावर सपकाळ यांनी जोरदार आसूड ओढले. “दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणींचे लाड केल्याचे नाटक सुरू आहे, पण प्रत्यक्षात महागाईने सर्वसामान्यांचा गळा कापला जात आहे. हे ‘देवा भाऊ’ नसून केवळ ‘मेवा भाऊ’ आहेत,” अशा शब्दांत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. पुण्यात कोयता गँगचा सुळसुळाट आणि जमिनी बळकावण्याचे प्रकार हे सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाहीत, असा थेट आरोपही त्यांनी केला.

नुरा कुस्तीचा तमाशा!

भाजप आणि अजित पवार गटाच्या युतीवर टीका करताना सपकाळ म्हणाले, “मी मारायचे सोंग करतो, तू रडायचे सोंग कर, अशी यांची नुरा कुस्ती सुरू आहे. लोकांसमोर भांडायचे नाटक करायचे आणि आतून मलिदा लाटताना एकत्र बसायचे, ही यांची नीती आहे.” पुण्यात पाणी प्रश्न आणि वाहतुकीची कोंडी जशीच्या तशी असताना, हे नेते केवळ जाती-धर्मात तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेत आहेत, अशी सडकून टीका त्यांनी केली.

परिवर्तनाचे आवाहन

प्रभाग २१ मधील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अक्षय अनिलकुमार जैन, योगिता सुराणा, डॉ. स्नेहलता पाडळे आणि पुष्कर आबनावे यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. “पुण्याचा स्वाभिमान जागा करण्याची आणि या नुरा कुस्ती करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचण्याची वेळ आली आहे. हाताच्या पंजाला साथ देऊन काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा,” असे आवाहन सपकाळ यांनी शेवटी केले.

मुकुंदनगरच्या या सभेतून काँग्रेसने दिलेली ही डरकाळी आगामी निवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पाडणार, हे आता स्पष्ट दिसत आहे!

 

 


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!