इचलकरंजीच्या तारदाळकर कुलकर्णी परिवाराचा पुण्यात रंगला ‘चतुर्थ पिढी’ स्नेहसोहळा


नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी नव्या पिढीचा पुढाकार; दीडशे वर्षांचा इतिहास जागवला

इचलकरंजी : धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत कौटुंबिक संवाद दुर्मिळ होत चालला असताना, इचलकरंजी येथील शतकभराचे वास्तव्य असलेल्या तारदाळकर कुलकर्णी परिवाराने एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. या परिवाराच्या तब्बल चार पिढ्यांचा भव्य ‘पारिवारिक स्नेहमेळावा’ नुकताच पुण्यात उत्साहात संपन्न झाला. नात्यातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्या-जुन्या पिढीची ओळख व्हावी, या उद्देशाने आयोजित हा सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

दीडशे वर्षांच्या इतिहासाला उजाळा

तारदाळकर कुलकर्णी परिवाराला गंगाधर खंडो कुलकर्णी यांच्यापासून सुमारे दीडशे ते पावणेदोनशे वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने दिवंगत आत्माराम कुलकर्णी (१८९५-१९४५) आणि रुक्मिणीबाई कुलकर्णी (१९००-१९७७) या दांपत्याच्या आठ अपत्यांच्या (केशव, शकुंतला, लीला, गोपाळ, कमल, माधव, रघुनाथ आणि महानंदा) वंशावळीतील सर्व सदस्य एकत्र आले होते. जरी ही आठ भावंडे आज हयात नसली, तरी त्यांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन वाढलेली चौथी पिढी या सोहळ्यात हिरिरीने सहभागी झाली होती.

ज्येष्ठ सदस्यांच्या उपस्थितीत चैतन्याचा सोहळा

पुण्यातील एका मंगल कार्यालयात पार पडलेल्या या मेळाव्याचे आकर्षण म्हणजे ९० वर्षांच्या ज्येष्ठ सदस्य मीनाकाकू रघुनाथराव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती. वयाच्या नव्वदीपासून ते अवघ्या दोन महिन्यांच्या बाळापर्यंत, कुटुंबातील सख्खे-चुलत, आते-मामे भावंडे, जावई, सुना, नातवंडे, पणतू आणि खापरपणतू अशा सर्वांनी यात सहभाग नोंदवला.

आठवणींचे रंग आणि भविष्याची दिशा

मेळाव्यात केवळ स्नेहभोजनच झाले नाही, तर जुन्या आठवणींना उजाळा देत भविष्यातील वाटचालीवरही संवाद झाला. अनेक सदस्य नोकरी-व्यवसायानिमित्त महाराष्ट्र, भारत आणि परदेशात स्थायिक आहेत. अनेकांनी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांच्या माध्यमातून सामाजिक समरसतेचा आदर्श जपला आहे. यातील उच्चविद्याविभूषित सदस्यांनी विविध क्षेत्रांत आपला नावलौकिक मिळवला आहे. मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पूर्वजांच्या छायाचित्र फलकाने सर्वांना आपल्या मुळांची जाणीव करून दिली.

नव्या पिढीने स्वीकारली जबाबदारी

व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून जगभरात विखुरलेले हे सदस्य संपर्कात असले, तरी प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळाच होता. नव्या पिढीतील काही तरुण सदस्य एकमेकांना प्रथमच भेटत होते. एक दिवसाचा वेळ अपुरा पडला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, इथून पुढेही असे मेळावे नियमित घेण्याची जबाबदारी कुटुंबातील तरुण पिढीने आनंदाने स्वीकारली आहे.

सध्याच्या कडक उन्हाळ्यात या मेळाव्याच्या निमित्ताने आलेल्या ‘भावनिक ओलाव्याने’ प्रत्येक घटक सुखावून गेला. विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात तारदाळकर कुलकर्णी परिवाराने एकत्र येऊन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!