प्रवास नरकयातनांचा, पण माणुसकीच्या देवदूतांचा मदतीला धाव!
पुणे-मुंबई महामार्गावर १९ तास प्रवाशांचा जीव टांगणीला; नगरसेवक तंतरपाळे आणि रघुवीर शेलार यांची माणुसकीची थाप


देहूरोड | प्रतिनिधी: पुणे-मुंबई महामार्गावर जणू काळाचा अक्राळविक्राळ जबडा उघडावा, तसा तो प्रोपलीन गॅसचा टँकर आडोशी बोगद्याजवळ आडवा झाला आणि आनंदाचा प्रवास एका क्षणात नरकयातनेत बदलला! वाहनांच्या लांबच लांब रांगा, रखरखते ऊन आणि पोटात पडलेला भुकेचा जाळ… तब्बल १९ तास हजारो प्रवासी या चक्रव्युहात अडकले होते. पण म्हणतात ना, ‘माणुसकी अजून मेलेली नाही’, याचेच दर्शन काल किवळे आणि देहूरोड परिसरात घडले.

तहानलेल्या कंठांना फुटला पाझर..!
यशवंतराव चव्हाण महामार्गावर जेव्हा प्रवाशांचे हाल होत होते, विशेषतः महिला आणि बालकांची अवस्था पाहून हृदय हेलावून जात होते, तेव्हा नवनिर्वाचित नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे हे केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर एक ‘माणूस’ म्हणून धावून आले. मुकाई चौक आणि किवळे पॉइंटवर त्यांनी पाण्याचे जणू गंगेचे लोटच आणले! तहानलेल्या प्रवाशांना आणि एसटी चालकांना पाणी वाटप करताना त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान कोणत्याही निवडणुकीच्या विजयापेक्षा मोठे होते. “आणखी काही हवे असल्यास सांगा, आम्ही प्रशासनाशी लढायला तयार आहोत,” हा त्यांचा शब्द प्रवाशांना मोठा आधार देऊन गेला.
शेलारांचा ‘स्नेह’ अन् स्वच्छतेचा मंत्र!
दुसरीकडे, देहूरोडचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार हे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली एखाद्या ‘देवदूता’सारखे प्रकटले. नुसते पाणीच नव्हे, तर भुकेने व्याकुळ झालेल्या प्रवाशांच्या हातात बिस्किटांचे पुडे पडले, तेव्हा अनेकांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू तरळले. शेलार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ अन्न-पाणी देऊनच थांबले नाहीत, तर ‘स्वच्छतेचा’ अत्रेछाप वारसाही जपला!
“संकटात मदत करणे हे कर्तव्यच, पण कर्तव्यानंतरचा कचरा साफ करणे ही संस्कृती आहे!”
वाहतूक सुरळीत होताच रघुवीर शेलार, सचिन भुंबक आणि त्यांच्या चमूने संपूर्ण परिसर स्वच्छ करून एक नवा आदर्श घालून दिला. संकटाच्या समयी राजकारण बाजूला ठेवून धावून येणाऱ्या या ‘खऱ्या’ कार्यकर्त्यांमुळेच आजही महाराष्ट्राच्या मातीत माणुसकीचा सुगंध दरवळतो आहे.
यांनी घेतले परिश्रम: या मदतकार्यात अजय बखारिया, प्रज्वल वानखेडे, आशिष पांडे, मितेश चौधरी आणि बाबू कोळी यांसारख्या तरुणांनी रक्ताचे पाणी करून प्रवाशांची सेवा केली.



























