अज्ञान दूर करण्याचे सामर्थ्य गुरूं मध्येच: मौलाना शाह नजिरुद्दीन कादरी
अलहाज हजरत सय्यदी पीर ऐनी शाह (र.अ.) यांचा १० वा उरूस सोहळा पुण्यात उत्साहात संपन्न


पुणे : जीवनाच्या प्रवासात अज्ञान घालवून आत्मज्ञानाची ओळख करून देणारे माध्यम म्हणजे गुरू. आयुष्याच्या वळणावर जेव्हा आपण दिशाहीन होतो, तेव्हा स्वतःच्या अनुभवाच्या शिदोरीतून शिष्याला योग्य वाट दाखवून घडवण्याचे सामर्थ्य केवळ गुरूंमध्येच असते,” असे प्रतिपादन मौलाना शाह नजिरुद्दीन कादरी ऊर्फ मखदूमी शाह यांनी केले.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह किबला (र.अ.) यांच्या १० व्या उरूस सोहळ्यानिमित्त आयोजित ‘इमान अफरोज’ बयानामध्ये ते बोलत होते. भवानी पेठ येथील दुल्हा-दुल्हन कब्रिस्तान येथे गुरुवारी (दि. ५) हा सोहळा अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी पुणे शहरासह राज्यभरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.


धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
उरूसा निमित्त असरच्या नमाजनंतर हजरत यांच्या मजार-ए-मुबारकवर पारंपरिक पद्धतीने संदल अर्पण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक फातेहाख्वानी करून विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. मगरिबच्या नमाजनंतर आयोजित ‘लंगर-ए-आम’मध्ये (महाप्रसाद) हजारो भाविकांनी सहभाग घेतला. रात्री कोंढवा खुर्द येथील कम्युनिटी सोसायटीमध्ये ‘महफिल-ए-समा’चे आयोजन करण्यात आले होते, जिथे पहाटेपर्यंत सुफी संगीत आणि कव्वालीच्या माध्यमातून भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यासाठी शाह मोहिउद्दीन, शाह हबीबुद्दीन, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे अध्यक्ष नदीम मुजावर, नगरसेवक ॲड. गफूर पठाण, अंजुम इनामदार, शाह सुलतान नाझो, मुराद आतिश बेलगाम, शाहिद अजमेरी, इब्राहिम भाई, नासिर भाई उपस्थित होते. तसेच मुंबई, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून आलेले ऐनी परिवारातील सदस्य व सांगोला येथील रियाज व नसीर मुजावर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*मान्यवरांचा गौरव….*
या वेळी नगरसेवक ॲड. गफूर पठाण, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे अध्यक्ष नदीम मुजावर आणि बशीर चाचा यांचा विशेष सन्मान मौलाना शाह नजिरुद्दीन कादरी उर्फ मखदूमी शहा यांच्या हस्ते करण्यात आला.



























