इचलकरंजीत रस्ता सुरक्षेचा ‘नवा अवतार’! चिमुरड्यांच्या बुद्धीने आरटीओचे अधिकारीही चकित!


इचलकरंजीत रस्ता सुरक्षेचा ‘नवा अवतार’! चिमुरड्यांच्या बुद्धीने आरटीओचे अधिकारीही चकित!

इचलकरंजी अहो, नियम पाळायचे असतात ते केवळ दंडाच्या भीतीने नव्हे, तर आपल्या आणि दुसऱ्याच्या प्राणांच्या रक्षणासाठी, हे इचलकरंजीच्या पोरांनी जगाला ओरडून सांगितले आहे! निमित्त होते रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत आयोजित केलेल्या धडाकेबाज प्रश्नमंजुषा स्पर्धेचे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय शहापूर-इचलकरंजीच्या वतीने रोटरी क्लबमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत चिमुरड्यांनी ज्ञानाचे असे काही फटाके फोडले की, खुद्द आरटीओ साहेबही कौतुकाने थक्क झाले!

अधिकारी झाले प्रश्नकर्ते, पोरं झाली उत्तरदाते..!

कार्यक्रमाचे सारथ्य करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री. विजय इंगवले आणि सहाय्यक परिवहन अधिकारी माननीय श्रीमती अंकिता वांडेकर मॅडम स्वतः मैदानात उतरले होते. मोटर वाहन निरीक्षक गणेश माशाळकर आणि दत्तात्रय शिर्के यांनी प्रश्नांची अशी काही फिरकी टाकली, पण समोरच्या इचलकरंजीकर विद्यार्थ्यांनी चेंडू थेट सीमापार घालवला! वाहतुकीचे क्लिष्ट नियम, चिन्हे आणि सुरक्षितता यावर विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी ज्या तडफेने उत्तरे दिली, ते पाहून ‘आजची ही पिढी उद्याची जबाबदार नागरिक होणार’ याची खात्रीच पटली.

मार्गदर्शनाचा ‘सल्ला’ आणि रस्ता सुरक्षेचा ‘किल्ला’

नुसती स्पर्धा नव्हती, तर तो ज्ञानाचा महायज्ञ होता. विजय इंगवले साहेब आणि अंकिता वांडेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना काळजाला हात घातला. “रस्त्यावर चालताना नजर हटी की दुर्घटना घटी” हे सांगतानाच त्यांनी रस्ता सुरक्षेचा हेतू असा काही विशद केला की, उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याने ‘मी नियम पाळणारच’ अशी जणू प्रतिज्ञाच केली.

गजाननरावांचे स्वागत आणि रोड्रिक्स मॅडमचे सूत्रसंचालन

कार्यक्रमाची सुरुवात गजानन शिरगांवे यांनी अत्यंत नेटके प्रास्ताविक करून केली. तर सूत्रसंचालनाची धुरा रिटा रॉड्रिक्स मॅडम यांनी इतक्या खुबीने पेलली की कार्यक्रमातली रंगत शेवटपर्यंत टिकून राहिली. आर. एस. कुलकर्णी आणि रिटा रोड्रिक्स यांनी परीक्षक म्हणून चोख काम पाहिले. शेवटी कुलकर्णी मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले आणि इचलकरंजीच्या या रस्ता सुरक्षा यज्ञाची सांगता झाली.

थोडक्यात काय, तर नियम पाळण्याचं बाळकडू आज या पोरांना मिळालंय, आता वेध आहेत सुरक्षित प्रवासाचे!

 

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!