दिल्लीच्या सिंहासनाला पुण्याचा झणझणीत तोफखाना ! पंतप्रधानांना थेट ‘महागाई रत्न’ पुरस्काराचे निमंत्रण


दिल्लीच्या सिंहासनाला पुण्याचा झणझणीत तोफखाना ! पंतप्रधानांना थेट ‘महागाई रत्न’ पुरस्काराचे निमंत्रण

पुणेरी सळसळत्या रक्ताला आणि उपरोधाच्या धारदार शस्त्राला कधी आणि कुठे काय सुचेल, याचा नेम विधात्यालाही सांगता येणार नाही! ‘भारतरत्न’ मिळण्याची सुतराम शक्यता नसलेल्या दिल्लीच्या राजाला, पुणेकरांनी चक्क एक नवा कोरा, झगमगत्या तेजाचा आणि महागाईच्या चटक्यांनी रसरसलेला ‘महागाई रत्न’ पुरस्कार बहाल करण्याचे ठरवले आहे. पुणे शहर महिला काँग्रेसच्या स्वातीताई शिंदे यांनी थेट देशाच्या प्रधानसेवकांनाच पुण्याला येण्याचे ‘प्रेमळ’ निमंत्रण धाडले असून, सध्या या निमंत्रण पत्रिकेने पुणेरी पेठांमध्ये आणि दिल्लीच्या दरबारात एकच खळबळ उडवून दिली आहे!

पत्राचा रोख अत्यंत मर्मभेदी आणि खास पुणेरी तिरकस शैलीला साजेसा आहे. देशात गॅस सिलेंडरने हजार पार करून गृहकृत्यदक्ष महिलांचे बजेट कोलमडवले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती ऐकून वाहने गॅरेजमध्येच समाधी लावून बसली आहेत. भाजीपाला, दूध, अंडी आणि धान्य इतके महाग झाले आहे की, गरिबाने फक्त वासावरच पोट भरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्वातीताईंनी पत्रात मोठ्या कौशल्याने सुनावले आहे की, ‘महोदय, आपल्या १२ वर्षांच्या देदीप्यमान आणि लोककल्याणकारी कारभारामुळे आपल्याला ‘भारतरत्न’ मिळण्याची सुतराम शक्यता उरलेली नाही. परंतु, जनतेला महागाईच्या खाईत ढकलण्याच्या आपल्या अफाट कौशल्याची दखल घेऊन आम्ही आपल्याला ‘महागाई रत्न’ देण्याचे योजले आहे!’ काय हा कडकडीत कटाक्ष!

हा केवळ पुरस्कार सोहळा नाही, तर पुणेरी संस्कृतीला साजेसा एक महा-जलसा असणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, महागाईने होरपळलेल्या हजारो ‘लाडक्या बहिणी’ एकत्र येऊन “अस्से कमळ नको ग बाई…” हे नवीन लोकशाहीर ढंगातील समूहगीत सादर करणार आहेत. दिल्लीश्वरांच्या स्वागताला पुण्यात सनई-चौघडा वाजणार की गृहिणींच्या रिकाम्या डब्यांचा गजर होणार, हे पाहणे रंजक ठरेल.

ज्या देशात गरिबाच्या चुलीतील निखारा विझला आहे, तिथे पुण्याच्या महिलांनी उपरोधाची शेकोटी पेटवली आहे. दिल्लीच्या सिंहासनाला या पुरस्काराची झळ पोहोचते की ते नेहमीप्रमाणे मौन बाळगून राहतात, हे आता पुण्याचे बालगंधर्व रंगमंदिर किंवा शनिवारवाडाच ठरवेल! पण एक मात्र खरे, पुण्याच्या या निमंत्रणाने दिल्ली करांची झोप नक्कीच उडाली असणार!

आता प्रश्न एवढाच उरतो की, ५६ इंचाची छाती असलेले आपले पंतप्रधान पुण्याच्या या ‘लाडक्या भगिनीं’चे प्रेमळ आणि तितकेच झोंबणारे निमंत्रण स्वीकारून ‘महागाई रत्न’ घेण्यासाठी पुण्यात पाऊल ठेवणार का? पुणेकर मात्र स्वागताची आणि ‘अस्से कमळ नको ग बाई’च्या तालाची तयारी करून बसले आहेत!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!