आकड्यांचा हा ‘अकरावा’ अवतार : ओपनने घास पळवला आणि क्लोजने झोप चोरली !

महाराष्ट्राच्या मातीला कष्टाचा आणि घामाचा सुगंध ठाऊक आहे, पण सध्या गल्लोगल्ली ‘मटका’ आणि ‘ऑनलाइन जुगाराचा’ एक उग्र दर्प येऊ लागला आहे. माणसाचा जन्म हा पुरुषार्थ गाजवण्यासाठी असतो, पण इथला सामान्य माणूस सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत एखाद्या वेड्यासारखा ‘आकड्यांच्या’ मागे धावतोय. हे दृश्य पाहून कुणालाही संताप येईल आणि जो संतापत नाही तो माणूसच नव्हे!
जेवणाच्या ताटावर ‘ओपन’चे सावट
दुपारची वेळ म्हणजे माणसाने तृप्त होऊन चार घास जेवण्याची वेळ. पण आमचा हा ‘नशिबवान’ जुगारी जेवणाच्या ताटासमोर बसला की त्याला अन्नाची चव लागत नाही. त्याला वास येतो तो फक्त ‘कल्याण’ आणि ‘मेन’च्या आकड्यांचा! घास तोंडात घ्यावा तर मनात धाकधूक- “ओपन काय येईल?” वरणाऐवजी त्याला आकड्यांची ‘बेरीज’ दिसू लागते. अहो, ज्या खेळाने पोट भरण्याऐवजी भूकच मरते, तो खेळ खेळायचा कशासाठी? या ‘ओपन’ने माणसाच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.
रमी : सन्मानाने भिकेला लागण्याचे साधन.
आता त्यात भर पडली आहे ती या ‘रमी’ नावाच्या सुशिक्षित जुगाराची! टीव्ही लावला की नट-नट्या दात कोरत सांगतात ‘रमी खेळा’. अहो, रमी खेळून कुणाचा संसार सोन्याचा झाल्याचं कोणी ऐकलं नाही! ही रमी म्हणजे बुद्धीचा कस नाही, तर खिसा रिकामा करण्याचा ‘डिजिटल फास’ आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर पत्ते पिसता पिसता तुमचं आयुष्य कधी पिसलं जातं आणि तुम्ही कधी ‘शो’ होता, हे कळतही नाही. रमी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, सन्मानाने भिकेला लागण्याचं एक आधुनिक साधन आहे!
■ त्या ‘तीन पानांचा’ तेरवा ! ■
मटक्यापेक्षाही भयंकर कीड जर कोणती असेल, तर ती म्हणजे हा ‘तीन पाणी’ जुगार! अहो, ही तीन पाने नाहीत, हे तर तुमच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे तीन राक्षस आहेत. एक्का, राजा आणि राणीच्या नादात हा स्वतः मात्र ‘गुलाम’ होऊन जातो. ज्याच्या हातात कष्टाची अवजारे असायला हवीत, त्याच्या हातात जेव्हा ही जुगाराची पाने येतात, तेव्हा समजून जावे की- आता संसाराचा ‘तेरवा’ व्हायला वेळ लागणार नाही! हा खेळ बुद्धीचा नाही, तर शुद्धी हरवलेल्या माणसांचा आहे!
क्लोजची ‘रात्र’ वैऱ्याची..!
माणूस दिवसभर राबतो तो शांत झोप मिळावी म्हणून. पण या ‘क्लोज’ नावाच्या सैतानाने माणसाची झोपही लिलावात काढली आहे. रात्री अकरा वाजले की हा पठ्ठ्या मोबाईलवर कान लावून बसतो. रात्री क्लोज हुकला की मग सुरू होते नशिबाला आणि देवाला शिव्या देण्याचे सत्र. ज्या डोळ्यांत उद्याच्या स्वप्नांचे अंजन हवे, तिथे आज ‘क्लोज’च्या अपयशाचे काजळ साचलेले असते. झोप उडते ती फक्त एका माणसाची नाही, तर त्याच्या मागे असलेल्या आख्ख्या कुटुंबाची!
कडक प्रहार
आम्ही विचारतो, हे कुठवर चालणार? बुकीला श्रीमंत करण्यासाठी तुम्ही आपली पोरं-बाळं उघड्यावर का पाडताय? लक्षात ठेवा, ज्याचा ‘ओपन’ बिघडला त्याचा दिवस गेला, आणि ज्याचा ‘क्लोज’ बिघडला त्याचे आयुष्यच अंधारात गेले! आता तरी शुद्धीवर या, नाहीतर काळाचा क्लोज तुम्हाला कधी संपवून टाकेल हे कळणार सुद्धा नाही!


























