चिमुरड्यांच्या रक्तावर श्रीमंतीची चरबी चढवणाऱ्या मालकांनो, आता सावधान!


चिमुरड्यांच्या रक्तावर श्रीमंतीची चरबी चढवणाऱ्या मालकांनो, आता सावधान!

ज्या कोवळ्या हातांत पाटी-पेन्सिल असायला हवी, त्या हातांत कोळसा आणि हातोडा देणाऱ्या नराधम मालकांचे धाबे आता दणाणले आहेत! ‘बालदेवो भव’ म्हणणाऱ्या या देशात चिमुरड्यांच्या कष्टावर आपली घरे उबदार करणाऱ्या आणि श्रीमंतीची चरबी चढवणाऱ्या मालकांविरुद्ध आता फौजदारी गुन्ह्यांचा ‘चाबूक’ ओढला जाणार आहे. बालकामगार आढळल्यास एका-एका पोरामागे २० हजार रुपयांचा दंड वसूल करून या मालकांची मस्ती जिरवण्याचा कडक निर्धार प्रशासनाने केला आहे.

मजुरीच्या खाईतून शिक्षणाच्या प्रकाशाकडे.!

एकीकडे आपण प्रगतीच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे हॉटेलच्या कोपऱ्यात किंवा कारखान्याच्या धुराड्यात एखादा ‘छोटू’ आयुष्याची राख रांगोळी करताना दिसतो. हे दृश्य म्हणजे माणुसकीला लागलेला कलंक आहे! या अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता केवळ कागदी घोडे नाचवले जाणार नाहीत. जोखमीच्या व्यवसायातून मुक्त केलेल्या बालकांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीचा आधार दिला जाणार आहे, जेणेकरून गरिबीच्या नावाखाली पुन्हा कोणताच ‘अभिमन्यू’ मजुरीच्या चक्रव्यूहात अडकणार नाही.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात ‘बदला’ घेणारा कक्ष..!

कामगार विभागाने आता कंबर कसली असून जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बालकामगार कक्ष’ नावाचा एक स्वतंत्र किल्लाच उभारला जाणार आहे. पालकांनीही आपल्या पोटच्या गोळ्याला पैशांसाठी कसाई मालकांच्या दावणीला बांधू नये, यासाठी कडक जरब बसवण्यात येणार आहे. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या काळात त्यांना शिक्षणाची संधी मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि तो हिरावणाऱ्यांना आता माफी नाही!

शाळा भरणार, भविष्य घडणार!

केवळ मुक्तता करून शासन थांबणार नाही, तर या मुलांसाठी शाळा, अतिरिक्त शिक्षण वर्ग आणि शैक्षणिक साहित्याची पायाभूत सुविधा जिथल्या तिथे उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या हातांनी आजवर ओझी वाहिली, तेच हात आता उद्याच्या भारताचे भविष्य लिहितील, अशी व्यवस्था केली जात आहे.

थोडक्यात काय, तर… मुलांच्या डोळ्यांतील अश्रू पुसून तिथे विद्येचे अंजन घालण्याचा हा प्रयत्न म्हणजे त्या नराधम मालकांच्या श्रीमुखात लगावेला एक वैचारिक सणसणीत टोला आहे!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!