शिवरायांचा खोटा इतिहास पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध; इचलकरंजीत चर्चासत्र

इचलकरंजी : इतिहासाचे चुकीचे दाखले देऊन समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या आणि छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी शहीद कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील मांडणीवर आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर सखोल चर्चा झाली.
आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने प्रशांत आंबी यांना दिलेली धमकी आणि कॉ. पानसरे यांच्याबद्दल वापरलेली भाषा ही संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे. अशा प्रवृत्तींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच छत्रपती शिवरायांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबांचाही धिक्कार करण्यात आला.
१९८८ साली सर्वप्रथम समाजवादी प्रबोधिनीने प्रकाशित केलेले हे पुस्तक शिवरायांच्या खऱ्या लोककल्याणकारी कार्याची ओळख करून देते. या पुस्तकातील मांडणी वस्तुनिष्ठ असल्याने त्यावर आक्षेप घेता येत नाही, म्हणूनच जाणीवपूर्वक अर्थहीन मुद्दे चर्चेत आणून समाजाची दिशाभूल करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. गेल्या ३८ वर्षांत या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून लाखो प्रती लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत, हे या पुस्तकाच्या लोकप्रियतेचे प्रतीक आहे.
चर्चासत्राचा समारोप करताना सांगण्यात आले की, शिवरायांचे राज्य रयतेला आपले वाटत होते कारण त्यात लोककल्याणकारी विचारांची प्रेरणा होती. आज केवळ प्रतिमांचे पूजन न करता, त्यांच्या विचारांचे जतन करून त्या आधारे कार्य करणे हीच काळाची गरज आहे.
या चर्चेत प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, प्रा. रमेश लवटे, पांडुरंग पिसे, अशोक केसरकर, दयानंद लिपारे, देवदत्त कुंभार, शकील मुल्ला, नारायण लोटके, शहाजी धस्ते, मनोहर जोशी आणि अशोक माने आदींनी सहभाग घेतला.



























