कर्तव्याचा सूर्य नव्या क्षितिजावर तळपायला सज्ज; सौ. एस. पी. पाटील मॅडम यांचा ऐतिहासिक निरोप सोहळा..!

इचलकरंजी : शहापूरच्या ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा परिसर आज केवळ भावूक झाला नव्हता, तर एका तेजस्वी कारकिर्दीला सलाम करण्यासाठी नतमस्तक झाला होता. ज्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण शिक्षणाच्या वारीत खर्च केला, अशा कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका सौ. एस. पी. पाटील मॅडम ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त आज शाळेत पार पडलेला सोहळा म्हणजे कृतज्ञतेचा महासागरच होता!
कर्तृत्व असे की हिमालयही ठेंगणा वाटावा..!
मॅडम म्हणजे केवळ मुख्याध्यापिका नव्हत्या, तर त्या या शिक्षण-पंढरीच्या खऱ्या अर्थाने ‘विठ्ठलाई’ होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थिनींनी यशाची शिखरे पादाक्रांत केली. आज शाळेचा संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ जेव्हा एकत्र जमला, तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती—शाळेचा कणा आज निवृत्त होत असला, तरी त्यांनी दिलेली शिस्त आणि मूल्ये शाळेच्या रक्तामासात कायम राहतील.
मनावर कोरलेले नाव..!
या भावूक प्रसंगी आपल्या लाडक्या मुख्याध्यापिकेला निरोप देताना सहकाऱ्यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना शिक्षक म्हणाले की,
“माणूस खुर्चीवरून निवृत्त होतो, पण माणसांच्या मनातून कधीच निवृत्त होत नाही!” हे शब्द उच्चारले जात असताना उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. हे वाक्य म्हणजे सौ. पाटील मॅडम यांनी कमावलेल्या ‘माणुसकीच्या संपत्तीची’ ही खरी पावती आहे.
शुभेच्छांचा वर्षाव
हा निरोप म्हणजे थकलेल्या पाऊलांचा शेवट नाही, तर एका महान ध्येयपूर्तीनंतर मिळालेल्या सन्मानाचा सोहळा आहे! मॅडम, तुम्ही शाळेच्या प्रशासकीय जबाबदारीतून मोकळ्या होत असलात, तरी समाजाला तुमच्यासारख्या अभ्यासू आणि करारी नेतृत्वाची आजही गरज आहे.
ताराबाई हायस्कूलच्या या तेजस्वी नेतृत्वाला पुढील निरामय आयुष्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह परिवारातर्फे तुफानी शुभेच्छा..!




























