ताम्हिणी घाट महिला हत्या प्रकरण: रायगड पोलिसांची धडक कारवाई, २४ तासांत दोन्ही आरोपी जाळ्यात!
**रायगड: सुनील पाटील :
ताम्हिणी घाट परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत या घटनेचा छडा लावला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या दोन संशयित तरुणांना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३५ च्या सुमारास माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत, पुणे-माणगाव रस्त्यालगतच्या दरीत २५ ते ३० वयोगटातील एका महिलेचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला होता. सुरुवातीला माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, वैद्यकीय तपासात महिलेचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २६ ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि २३८ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
**तपासाची चक्रे आणि ओळख**
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.
समांतर तपास सुरू असताना, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख सुमन गोपाल यादव (रा. चिखली, पुणे; मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) अशी पटली. अधिक तपासात या प्रकरणात चिखली येथे राहणारे दुर्गाप्रसाद मंगालप्रसाद प्रजापती (वय २४) आणि दिनेशकुमार बिसराम प्रजापती (वय २७) या दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले.
**फिरण्याच्या बहाण्याने नेऊन कृत्य**
संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी महिलेला फिरण्याच्या बहाण्याने ताम्हिणी घाटात आणून ओढणीच्या साहाय्याने तिची हत्या केली व मृतदेह दरीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. मानसिंग पाटील, पोसई सूरज पाटील, नरेश निंबाळकर व पथकातील पोलीस अंमलदारांनी कामगिरी बजावली. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, घटनेमागील मूळ कारणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
कारवाई पथक
सपोनि. श्री. मानसिंग पाटील, पोसई. सुरन पाटील, पोसई, नरेश निंबाळकर, सहा. फौजदार संदीप पाटील, पो. हवा./१०४९ विनोद पाटील, पो. हवा./७९९ अमोल हंबीर, पो. हवा./७४६ रूपेश निगडे, पो. हवा./७९४ रविंद्र मुढे, पो. हवा./७९५ प्रतीक सावंत, पो. हवा./९०० शाम खराडे, पो. हवा./१०९१ रणनितसिंह खराडे, पो. हवा./१६०९ मनोहर शिरतार, पो.हवा./२३४४ अक्षय पाटील, पो. हवा./२३२८ सचिन वावेकर, चापोशि. /५१५ सागर थळे, पोशि./३६१ प्रशांत लोहार, पोशि./१८४९ प्रदिप खरात, पोशि. /४५४ अक्षय जगताप, सर्व नेमणूक स्था.गु.अ.शा. रायगड अलिबाग, तसेच पोहवा. २२९३ तुषार घरत, नेम. (सायबर सेल)





























