नाशिक व अहिल्यानगर उपकेंद्रांचा इतिहास…
डॉ. तुषार निकाळजे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे उद्घाटन होत आहे. अहमदनगर (अहिल्यानगर) उपकेंद्राला १९८६ सालापासूनचा इतिहास आहे. नाशिक उपकेंद्राला वर्ष २०१४ सालापासून सुरुवात झाली. पुणे विद्यापीठा अंतर्गत पुणे शहर, पुणे जिल्हा, अहमदनगर, नाशिक, धुळे व जळगाव या जिल्ह्यांच्या महाविद्यालयांचा समावेश वर्ष १९९५ पर्यंत होता. वर्ष १९९५ नंतर धुळे व जळगाव जिल्ह्यांच्या महाविद्यालयांकरिता स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना झाली. त्याचबरोबर तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या प्रयत्नामुळे वैद्यकीय अभ्यासक्रम नाशिक वैद्यकीय विद्यापीठाकडे वर्ग झाला व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना झाली. अहमदनगर उपकेंद्र सुरू करणे बाबत डॉ. व्ही.जी.भिडे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन तत्कालीन शिक्षण मंत्री राम मेघे व माननीय मुख्यमंत्री श्री. शंकरराव चव्हाण यांच्याशी चर्चा करून अहमदनगर उपकेंद्राची स्थापना केली. पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव श्री. सुभाषचंद्र भोसले, त्यावेळचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे मेंबर डॉ. शिवाजीराव कदम व प्राध्यापक के.डी. जाधव यांनी देखील पुढाकार घेतला.
नाशिक येथील महाविद्यालयात काम करणारे कर्मचारी व विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य श्री. बाबुराव चव्हाण, श्री. खैरे, विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून स्वीकृत अधिसभा सदस्य म्हणून श्री. विठ्ठल साठे, जळगाव जिल्ह्यातील प्राचार्य चित्तेसर, धुळे जिल्ह्यातील श्री. बाबा हात्तेकर (अधिसभा सदस्य), प्राध्यापिका दुर्गा दीक्षित, प्रा. होले हुन्नूर (मूळ कर्नाटकचे, परंतु पेमराज सारडा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाल्यानंतर विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर काम केलेले) यांनी त्यावेळी कुलसचिव, विविध अधिकार मंडळाच्या सदस्यांची भेट घेऊन विद्यापीठ अधिकार मंडळाच्या सभेमध्ये अहमदनगर येथील उपकेंद्राला मूर्त स्वरूप आणले. विद्यापीठाच्या कायदा विभागाच्या अधिकारी सौ. शोभना पाटील यांचे कायदेविषयक सहाय्य विसरता येणार नाही. धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक येथून येणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून विद्यापीठातील बरेचसे अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनांचे पदाधिकारी विशेष काळजी घेत असत. यामध्ये वित्त विभागाचे श्री. राजा नेर्लेकर, श्री नवनाथ कांबळे, श्री. बाळासाहेब मेहेत्रे, परीक्षा विभागातील उपकुलसचिव श्री.एस. पी. जोगळेकर, गोपनीय कक्षाचे प्रमुख श्री. विठ्ठल घोलप, सहाय्यक कक्षाधिकारी श्री. सुभाष गोविंद कुलकर्णी, सहायक कुलसचिव श्री. शशिकांत धेंडे, ट्रान्सस्क्रिप्ट विभागाच्या टायपिस्ट श्रीमती लक्ष्मीबाई रोकडे (जाधव), प्रमाणपत्र विभागातील कर्मचारी श्री. बाळासाहेब कुंभार, २६ वर्षे कुलगुरू कार्यालयात लघु टंकलेखक म्हणून काम केलेले श्री.भानुदास ढगे यांनी धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक येथील विद्यार्थ्यांच्या तक्रारी किंवा प्रश्न कुलगुरूं पर्यंत जाऊ न देता, संबंधित विभाग प्रमुख व विभाग यांचे मार्फत सोडविल्या. परीक्षा विभागातील शिपाई विलास सातपुते व सुरेश शेडगे, याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर श्री. केळकर, गेस्ट हाऊसचे कर्मचारी श्री. गुरुमुख आहुजा, कामगार संघटनांचे पदाधिकारी श्री. सुरेश वाघमारे, श्री.डी. जी. कांबळे, श्री.विनोद हंबीर यांचा समावेश आहे. न्यू आर्ट सायन्स व कॉमर्स कॉलेजचे प्राध्यापक पाटीलबा एकनाथ भराडी, कळवण महाविद्यालयाचे प्राध्यापक रावसाहेब शिंदे, अहमदनगर येथील प्राध्यापक सर्जेराव निमसे, बारामती महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गोधा, भोसला मिलिटरी कॉलेजचे (नाशिक) कर्मचारी इत्यादींचे योगदान यामध्ये आहे. इतर बऱ्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील याबाबत सहकार्य केले. कोणताही भेदभाव न करता विद्यार्थ्यांना विनंती करून प्राधान्याने परदेशी विद्यार्थ नंतर धुळे, जळगाव व अहमदनगर नाशिक व पुणे शहर, जिल्हा येथील विद्यार्थ्यांचे प्रश्न योग्य प्रकारे सोडवले. नाशिक व अहमदनगर येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अशा व्यक्तींनी सहकार्य केले. केवळ पगार मिळतो म्हणून काम करावे, यापेक्षा विद्यार्थी हित महत्त्वाचे व भावी पिढीचा विकास महत्त्वाचा या भावनेने काम केले जात असे व आहे. वर्ष २०११ पर्यंत हा प्रश्न थोडा संथ झाला. तदनंतर अहमदनगर जिल्ह्यातील श्री.शिवाजी साबळे या विद्यापीठाच्या अधिसभा सदस्याने पाठपुरावा केला. वर्ष २०१२ नंतर तत्कालीन संचालक बी.सी.यु.डी. पदावर डॉ. व्ही.बी. गायकवाड यांची नियुक्ती झाल्यानंतर यास गती मिळाली. तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या ही बाब निदर्शनास आणली. कुलगुरू डॉ. गाडे यांनी डॉ.व्ही.बी. गायकवाड व वित्त अधिकारी सीए डॉ. विद्या गारगोटे व काही अधिकार मंडळाचे सदस्य यांच्या शिष्टमंडळासह बृहत आराखडा तयार केला. नाशिक येथील या उपकेंद्रास स्वतंत्र कर्मचारी वर्ग व संचालक नेमणूक बाबत अधिकार मंडळाकडे प्रस्ताव सादर करून मंजूर केला. शासनाची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली. राष्ट्रीय उच्चतर शिक्षण प्रकल्प अंतर्गत यासाठी स्वतंत्र निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला.
वर्ष २०१९ मध्ये समन्वयक प्रा. प्रशांत टोपे यांनी उपकेंद्राच्या इमारतीच्या उभारणीसाठी स्वतंत्र निधीसाठी विद्यापीठाकडे मागणी केली होती. तदनंतर स्वतंत्र इमारत हा विषय जलद गतीने सुरू झाला. दोन दिवसांनी नाशिक येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने वरील व्यक्तींच्या कार्यास विसरता येणार नाही. कार्यालय म्हणून काम करण्यापेक्षा आपल्या कुटुंबाचा विकास कसा होऊ शकतो, याचे हे एक उदाहरण आहे. विद्यापीठाची अशीच भरभराट होवो ही सदिच्छा.




























