मिरजेत तहसीलदारांना धडक निवेदन; गोपीचंद पडळकरांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ
जेव्हा जेव्हा या देशातील कष्टकरी, शेतकरी आणि मेंढपाळ समाजावर अन्यायाची कुऱ्हाड कोसळते, तेव्हा तेव्हा पेटून उठणे हा या मातीचा गुणधर्म आहे! धनगर समाजाच्या न्याय्य आणि हक्काच्या मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ‘आक्रोश मोर्चा’चा वणवा पेटला आहे. याच आंदोलनाची धग आज मिरज शहरात पहायला मिळाली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या एल्गाराला संपूर्ण पाठिंबा देत, मिरज तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने आज मिरज तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार सौ. अपर्णा मोरे मॅडम यांना मागण्यांचे एक सडेतोड निवेदन सुपूर्द करण्यात आले. हे निवेदन तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
मागण्यांचा ‘पंचबाण’: सरकारला थेट इशारा!
निवेदनातून प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना खडसून विचारण्यात आले आहे की, धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम अजून किती दिवस चालणार? निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
१. आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा: धनगर आरक्षणाचा प्रश्न आता कागदावर राहता कामा नये. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली केस सरकारने संपूर्ण ताकदीने लढवावी. आणि जर कायदा अथवा न्यायालयाचा निर्णय प्रतिकूल आला, तर सरकारने केवळ हात वर न करता आधीच ठोस ‘Plan-B’ तयार ठेवावा!
२. संत बाळूमामा देवस्थानचा स्वतंत्र कायदा करा: आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा. मंदिरातील २१ विश्वस्तांपैकी ११ विश्वस्त आणि अध्यक्षपद हे प्रत्यक्ष मेंढपाळ समाजातीलच व्यक्तीला मिळाले पाहिजे, ही समाजाची ठाम भूमिका आहे.
३. वीर सिंगारोबांचे नाव missing link ला द्या: लोणावळा येथील ‘Missing Link’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हुतात्मा वीर सिंगारोबा धनगर यांचे नाव देऊन त्यांच्या बलिदानाचा योग्य सन्मान करा.
४. चर्चगेट स्टेशनला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव द्या: मुंबईतील ऐतिहासिक चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे.
भीमथडीच्या पांढरपेशा अन्यायाविरोधात एकवटलेला समाज!
या प्रसंगी सुभाषनगरचे श्री किरण बंडगर सर, लिंगनुरचे मारुती उर्फ पिंटू पाटील, सावळीचे संदीप बंडगर, मालगावचे मयूर नाईकवाडे, सिद्धेवाडीचे पै. दादा दडस व विठ्ठल शिंगाडे, कृष्णा आवळे, मालगावचे परशुराम नरुटे व सिद्धू नरुटे, सुभाष नगरचे रावसाहेब लोखंडे, सिद्धेवाडीचे शामराव खरात सर आणि मालगावचे सागर माळी यांच्यासह मिरज तालुक्यातील धनगर समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार स्पष्ट दिसत होता.
तहसीलदार सौ. अपर्णा मोरे मॅडम यांनी हे निवेदन स्वीकारले असून, समाजाच्या या भावना आणि मागण्या तात्काळ राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.
आता प्रश्न हाच उरतो की, हे सरकार धनगरांच्या या आक्रोशाची दखल घेणार, की पुन्हा एकदा पोकळ आश्वासनांची खुलजा सिमसिम दाखवणार? धनगर समाज आता थांबणारा नाही, हाच स्पष्ट संदेश आजच्या या निवेदनातून प्रशासनाला मिळाला आहे!



























