प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय देऊन पोरांनी मिळवलं यश; मिरजेच्या आर. एम. हायस्कूलचा ८३.३३ टक्क्यांचा झेंडा..!
मिरज अशोक मासाळ :
अहो, निकाल तर दरवर्षी लागतो ! शंभर टक्के निकालाचे फटाके तर गल्लीतल्या ‘कॉन्व्हेंट’वाल्यांच्या अंगणात रोजच फुटतात. पण ज्यांच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य आहे, ज्यांच्या बापाला ‘शिक्षण’ नावाचा शब्दही नीट उच्चारता येत नाही आणि ज्यांच्या आईच्या हाताला राबून-राबून भेगा पडल्या आहेत, अशा कष्टकऱ्यांच्या लेकरांनी जेव्हा ८३.३३ टक्क्यांची मजल मारली, तेव्हा समजावे की हे केवळ ‘यश’ नाही, तर हा ‘क्रांतीचा’ हुंकार आहे! दि हिंद एज्युकेशन सोसायटी संचलित आर. एम. हायस्कूलने मार्च २०२६ च्या माध्यमिक परीक्षेत हाच क्रांतीचा झेंडा आज मिरजेच्या मातीत रोवला आहे.
यशाचा ‘आकडा’ लहान, पण ‘जिद्द’ आभाळाएवढी..!
आजकालच्या जगात शाळांचे मूल्यमापन केवळ टक्केवारीच्या तराजूत होते. पण आर. एम. हायस्कूलच्या या निकालाचा तोल केवळ गणितात करू नका. इथली मुले ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली नाहीत. कुणाचा बाप रिक्षा ओढतोय, कुणी शेतात राबतंय, तर कुणाची आई कष्ट उपसतेय. पण या ‘अभ्यासाच्या रणांगणावर’ मात्र ही पोरं वाघ ठरली आहेत! सुधा रामनिवास सहानी (७७.४०%), दीपश्री निंबाळकर (६९.४०%), रुक्मिणी इंगोले (६६.२०%) आणि चैतन्य कांबळे (६६.६६%) या मुलांनी प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय देऊन हे गुण मिळवले आहेत. शाब्बास पोरांनो! तुमच्या या गुणांची किंमत कुण्या धनिकाच्या ९० टक्क्यांपेक्षाही कित्येक पटीने जास्त आहे.
हे शिक्षक नव्हेत, हे तर उद्याच्या पिढीचे भाग्यविधाते.!
अहो, शिक्षक तर जगात खूप आहेत, जे येतात, तास घेतात आणि पगार पदरात पाडून घेतात. पण आर. एम. हायस्कूलचे हे शिक्षक म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानाचे ‘मशालजी’ आहेत! ज्या घरात सरस्वतीची कधी पावलं उमटली नाहीत, अशा पोरांना जवळ घेऊन, त्यांच्या डोळ्यांत स्वप्न पेरणं हे काही येऱ्यागबाळ्याचं काम नव्हे!
या शाळेतील प्रत्येक शिक्षक-शिक्षिकेने केवळ पुस्तकातील धडे गिरवून घेतले नाहीत, तर या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःची हाडं झिजवली आहेत. पोटच्या गोळ्याप्रमाणे या गरिबांच्या लेकरांना मायेचा हात दिला, त्यांच्याकडून रात्र-अपरात्र सराव करून घेतला आणि जेव्हा ही मुलं नापास होण्याची भीती होती, तेव्हा त्यांच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवून त्यांना यशाच्या शिखरापर्यंत खेचून नेलं. अहो, हे केवळ शिक्षक नाहीत, तर ते खऱ्या अर्थाने ‘संस्कारांचे शिल्पकार’ आहेत! ८३.३३ टक्के निकाल हा या शिक्षकांच्या रक्ताचं पाणी करून मिळवलेलं ‘तप’ आहे.
नेमका हाच आहे शिक्षणाचा अर्थ..!
संस्थेचे अध्यक्ष श्री. मिलिंद जाधव सर आणि सचिव श्री. राहुल साळुंखे सर यांनी केवळ इमारती उभ्या केल्या नाहीत, तर आत्मविश्वासाची माणसे उभी केली आहेत. “प्रत्येक विद्यार्थी पुढे गेला पाहिजे” हा त्यांचा ध्यास आज निकालाच्या रूपाने बोलतोय. मुख्याध्यापकांपासून ते शिपायापर्यंत सर्वांनी एकदिलाने काम केले, म्हणूनच आज हा सोन्याचा दिवस पाहायला मिळतोय.
ज्या शाळेत कष्टकऱ्यांची मुले ‘विद्वान’ बनतात, ती शाळा ही सरस्वतीचे मंदिर नव्हे, तर ‘माणूस घडवण्याचा कारखाना’ आहे. आर. एम. हायस्कूलच्या या सर्व योध्यांचे, त्यांच्या जिद्दी माय-बापाचे आणि त्या महान शिक्षकांचे त्रिवार अभिनंदन!


























