शिंगणापुरात भ्रष्टाचाराचा ‘पंचनामा’! लाचखोर तलाठी आणि उपसरपंचाचे काळं तोंड; एसीबीचा जोरदार दणका!
कोल्हापूर |
ज्या हातांनी सातबारा कोरा करायचा, त्याच हातांना भ्रष्टाचाराची खाज सुटावी? ज्याने जनतेची सेवा करायची, त्या तलाठ्याने आणि लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या उपसरपंचाने मिळून सामान्यांना लुटावे? छी:! तुमच्या त्या लाचखोर प्रवृत्तीचा धिक्कार असो! कोल्हापूरच्या शिंगणापुरात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) असा काही ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला की, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे धाबेच दणाणले आहेत. वडिलांचे नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी अवघ्या पाच हजार रुपयांची लाच घेताना इरफान सनदी नावाचा तलाठी आणि दीपक कांबळे नावाचा उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात अक्षरशः फडफडले आहेत!
नेमका काय आहे हा ‘भ्रष्ट’ प्रताप?
एका ३४ वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांचे नाव हक्काच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर लावण्यासाठी या सरकारी दरबारी चपला झिजवल्या. पण, शिंगणापूरचा हा तलाठी इरफान दिलावर सनदी (वय ४१) काय साधासुधा माणूस? त्याने थेट १० हजार रुपयांची ‘सुपारी’ मागितली. “पैसे द्या आणि नाव चढवा,” असा फतवाच जणू त्याने काढला होता. पण तक्रारदार तरुण बाणेदार निघाला! त्याने भ्रष्टाचारापुढे मान न झुकवता थेट एसीबीचे दरवाजे ठोठावले.
उपसरपंचाची ‘मध्यस्थी’ की भागीदारी?
गंमत पहा, या भ्रष्टाचाराच्या खेळात गावचा उपसरपंच दीपक सदाशिव कांबळे (वय ४३) हा देखील सामील झाला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवून घेणाऱ्या किंवा जनतेचे कैवारी म्हणवणाऱ्या या लोकप्रतिनिधीने तलाठ्याच्या वतीने लाचेची मागणी केली. ५ मार्चचा मुहूर्त ठरला, तडजोड ५ हजार रुपयांवर आली. “पैसे घेऊन ये आणि टेबलच्या खणात ठेव,” असे आदेश सुटले. पण त्यांना काय ठाऊक, की आज त्यांचा ‘बकरा’ होणार आहे!
एसीबीचा ‘खळबळजनक’ सापळा!
दुपारची वेळ… शिंगणापूरचे तलाठी कार्यालय… पैसे स्वीकारले गेले आणि तितक्यात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या वाघांनी झडप घातली! तलाठ्याच्या सांगण्यावरून उपसरपंचाने ते पाच हजार रुपये हाताळले आणि दोघेही रंगेहाथ पकडले गेले. लाचेची ती घाणेरडी रक्कम आणि त्यांचे गुन्हेगारी मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
“अहो, हे कसले लोकसेवक? हे तर जनतेचे रक्त पिणारे जळू आहेत..! जोपर्यंत अशा भ्रष्ट प्रवृत्तींना जेलची हवा मिळत नाही, तोपर्यंत हा महाराष्ट्र स्वच्छ होणार नाही!”
आता होणार घरझडतीचा ‘धडाका’!
करवीर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण एवढ्यावरच हे थांबलेले नाही. या ‘महाभागां’च्या शिंगणापूर आणि लाईन बाजारमधील घरांची आता एसीबीकडून झाडाझडती घेतली जात आहे. त्यांच्या घरात आणखी किती माया दडलेली आहे, याचा हिशोब आता जनतेला द्यावाच लागेल!


























