इचलकरंजीत माणुसकीची अंत्ययात्रा ; निधनाच्या बातमीवरून नातेवाइकांनीच उचलला महिलेवर हात !
इचलकरंजी : प्रतिनिधी :
इचलकरंजी: काय म्हणावे या इचलकरंजीच्या प्रतापाला.? जिथे मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारी माणसे आपण ऐकली होती, तिथे आता चक्क अंत्यसंस्काराच्या मांडवात रक्ताची नाती एकमेकांच्या जीवावर उठू लागली आहेत. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या कुटुंबाचे सांत्वन करायचे सोडून, “आम्हाला बातमी का दिली नाही?” असा जाब विचारत एका महिलेला बेदम मारहाण करण्याचा जो प्रकार घडला आहे, तो पाहून माणुसकीनेच आता मान खाली घातली आहे.

इचलकरंजीतील जाधव मळा परिसरात एका माऊलीच्या निधनामुळे आधीच शोककळा पसरली होती. नातेवाईक जमले होते, अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. अशातच स्वतःला ‘भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष’ म्हणवणारे सुनील प्रकाश जावळे आपल्या लवाजम्यासह तिथे प्रकटले. दुःख व्यक्त करतील तर ते जावळे कसले? त्यांनी चक्क “आम्ही जवळचे असून आम्हाला कळवले का नाही?” असा वादाचा सूर लावला. शब्दाने शब्द वाढला आणि बघता बघता सामाजिकतेचा बुरखा फाडून या ‘जावळे’ कुटुंबाने काजल लाखे नावाच्या महिलेवर हात उचलला.
महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, हे महाशय केवळ घरातच नव्हे, तर समाजातही आपला असाच ‘दरारा’ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना नाहक त्रास देऊन त्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करण्याचा या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याचा उद्योग आता चव्हाट्यावर आला आहे.
पिडीत महिलेने गप्प न बसता थेट पोलीस प्रशासनाचे दरवाजे ठोठावले. कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांपासून ते स्थानिक निरीक्षकांपर्यंत तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर, पोलिसांनी सुनील जावळे, त्यांची पत्नी लता, मुलगा राहुल आणि करण अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
समाजाची सेवा करण्याची ज्यांच्याकडे धुरा आहे, त्यांनीच जर भर रस्त्यात आणि तेही अंत्यसंस्काराच्या वेळी राडा घातला, तर सामान्य माणसाने कुणाकडे पाहायचे? नात्यातला ओलावा संपला की माणसाचे रूपांतर श्वापदात होते, याचाच प्रत्यय या घटनेने दिला आहे. आता पोलीस या ‘अध्यक्षांचा’ आणि त्यांच्या कुटुंबाचा किती ‘सन्मान’ करतात, हे लवकरच दिसेल!


























