इचलकरंजीचं ‘अमृत’ तारदाळच्या घशात घालण्याचा घाट ; ग्रामस्थांचा ‘केमिकल लोचा’ला कडाडून विरोध !
तारदाळ (ता. हातकणंगले) : सध्या कलियुग आहे असं म्हणतात ते काही खोटं नाही. पूर्वी लोक कुणाच्या दारात सोन्याचा धूर निघेल म्हणून प्रयत्न करायचे, पण इचलकरंजीच्या काही थोर नेत्यांना वाटतंय की तारदाळच्या शेतात चक्क ‘रासायनी गंगा’ अवतरावी! इचलकरंजीतील काही माजी आमदारांना अचानक तारदाळच्या शेतीबद्दल इतका पान्हा फुटला आहे की, प्रक्रियेच्या नावाखाली ‘रंगीत-संगीत’ पाणी तिकडे वळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण तारदाळच्या पठ्ठ्यांनीही ठणकावून सांगितलंय- “तुमचं हे केमिकलचं तीर्थ तुमच्याच पायी ठेवा, आमच्या शेतात असलं लोणचं नको!”
काल तारदाळ ग्रामपंचायतीत जणू ‘पाणीपत’चं युद्धच रंगलं होतं. निमित्त होतं ते या रासायनयुक्त पाण्याचा प्रस्ताव! गावकऱ्यांची बैठक म्हणजे नुसता विचारांचा गुलाल नाही, तर संतापाचा अंगार होता. बैठकीत नेत्यांनी असा काही पवित्रा घेतला की जणू समोर साक्षात तो ‘राक्षस’ (रासायनयुक्त पाणी) उभा आहे.
“आमची शेती काय प्रयोगशाळा आहे का?” असा सवाल इथल्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांनी विचारला. प्रसाद खोबे यांनी तर दंड थोपटूनच सांगितलं, “गावाच्या हितासाठी जर रणांगणात उतरावं लागलं, तर आम्ही मागे हटणार नाही. पण हे पाणी गावात आलं, तर मग आमचं नाव सांगायचं नाही!” त्यांच्या या डरकाळीने बैठकीत उपस्थितांच्या अंगात दहा हत्तींचं बळ संचारलं.
या बैठकीत अमित खोत, डी. पी. भगत, यशवंत वाघी यांच्यासह मंडळींची उपस्थिती पाहून असं वाटत होतं की, गावात पाहुणा म्हणून जरी ‘केमिकल’ आलं, तरी त्याला वेशीवरच आडवं केल्याशिवाय ही मंडळी स्वस्थ बसणार नाहीत. रणजित पोवार यांनी प्रास्ताविकातच विषयाचा असा काय पंचनामा केला की, जमलेल्या प्रत्येकाला आपल्या शेतात उद्या रसायनांचे वाफे दिसू लागले.
इचलकरंजीच्या नेत्यांना वाटतंय तारदाळला ‘प्रक्रिया’ केलेलं पाणी पाजावं, पण तारदाळकरांनी त्यांना उलट ‘प्रक्रिया’ करायचा इशारा दिला आहे. “गावात पाणी येऊ देणार नाही” हा निर्धार म्हणजे केवळ घोषणा नाही, तर नेत्यांच्या डोळ्यात घातलेलं झणझणीत अंजन आहे.
आता या ‘केमिकल लोचा’वर पुढची ग्रामसभा काय तोडगा काढतेय, की हे पाणी नेत्यांच्याच अंगावर उलटतंय, हे बघणं मजेशीर ठरेल!



























