भांडवल मिळणार, धंदा होणार; कार्वे एमआयडीसीत ‘बेरोजगारी’चा विसर्जन सोहळा..!

अशोक मासाळ :
विटा : आजवर आमच्या गावाकडच्या पोरांना एकच ‘उद्योग’ माहिती होता— तो म्हणजे एसटी स्टँडवर बसून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या मोजणे किंवा लग्नाच्या वरातीत बँडपेक्षा जोरात नाचणे! पण काल विट्याच्या कार्वे एमआयडीसीमध्ये रवींद्रजी माणगावे आणि कंपनीने असा काही ‘उद्योग’ मांडला की, आता गावचा तरुण टपरीवर उभा राहून ‘पुढचा मुख्यमंत्री कोण?’ यावर चर्चा करण्याऐवजी ‘पुढचा मार्केट लीडर कोण?’ यावर पैजा लावणार आहे.
ना नोकरीची चिंता, ना साहेबाची कटकट..!
ज्याला त्याला विचारलं की काय करतो? तर उत्तर यायचं— “पुण्यात नोकरी शोधतोय!” पण आता शोधायला नको आणि शोधायला लावायलाही नको. ‘उद्योग विचार मंच’ नावाचं एक भलंमोठं ‘पाणी’ विट्यात आलं आहे. रवींद्र माणगावे यांच्या दूरदृष्टीने ३६ हजार उद्योजक घडवायचं ठरवलंय. म्हणजे आता गावात प्रत्येक तिसरा माणूस ‘मालक’ असणार! आता प्रश्न हाच आहे की, जर सगळेच मालक झाले, तर एकमेकांच्या लग्नात वाजंत्री कोण वाजवणार? पण असो, रिकाम्या हाताला काम आणि खिशाला दाम मिळणार असेल, तर हा ‘आवाज’ विट्याला हवाच होता!
बँकेचा मॅनेजर आता ‘हात’ जोडणार..!
आजवर पोरगा बँकेत कर्जासाठी गेला की मॅनेजर त्याच्याकडे असा पाहायचा, जणू काही हा कर्ज नाही तर मॅनेजरची किडनीच मागायला आलाय! पण आता ‘एक खिडकी’ योजना आलीय. PMEGP आणि CMEGP सारख्या नावांच्या जंजाळात आता तरुण अडकणार नाही, कारण उद्योग विचार मंचचा ‘खांदा’ त्यांच्या मदतीला आहे. आता बँकांचे उंबरठे झिजवण्यापेक्षा कारखान्याची चाकं झिजवण्याचे दिवस आले आहेत.
विट्याचा ‘ब्रँड’ आता जगाच्या बाजारात..!
या कार्यक्रमाला रामेश्वर पवारांपासून ते रवींद्र बेंडखळेंपर्यंत मंडळी हजर होती. खानापूर तालुक्यात आता फक्त ऊस आणि द्राक्षच नाही, तर मशिनरी आणि प्रॉडक्ट्सही तयार होतील. ग्रामीण महाराष्ट्राचा हा स्वाभिमान जागा झाला आहे, हे नक्की!
“ज्या हातांनी क्रिकेटच्या बॅट धरल्या, तेच हात आता बॅलन्स शीट धरतील. ज्या तोंडांनी गुटखा खाऊन पिचकारी मारली, तीच तोंडं आता क्लायंटशी इंग्रजीत बोलतील!”
एकूण काय, तर विट्यात आता ‘क्रांती’चा श्रीगणेशा झालाय. आता फक्त पोरांनी जिद्द धरावी, म्हणजे झालं! नाहीतर ‘उद्योग विचार मंच’ उभा राहायचा आणि आमचा गडी पुन्हा ‘पुढच्या चौकात कोण आलंय?’ हेच पाहत बसायचा, असं व्हायला नको!



























