सत्तेच्या गर्वाला तरुणाईची चपराक: लोकशाही वाचवण्यासाठी नवी पिढी रणांगणात!


सत्तेच्या गर्वाला तरुणाईची चपराक: लोकशाही वाचवण्यासाठी नवी पिढी रणांगणात!

ईश्वरपूर (प्रतिनिधी):

देशात जेव्हा-जेव्हा लोकशाहीवर संक्रांत येते, तेव्हा-तेव्हा ती वाचवण्यासाठी राजकारण्यांचे उंबरठे न झिजवता थेट रणांगणात उतरणारी तरुण पिढीच पुढे येते. आपली लढाई कोणत्याही एका व्यक्तीशी वा नेत्याशी नसून, माणसा-माणसात आणि जाती-जातीत द्वेषाचे विष कालवणाऱ्या विकृत प्रवृत्तीशी आहे; नि हा लढा इथून पुढेही असाच पेटता राहणार, असा सणसणीत इशारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी दिला.

डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या स्मृतिदिनानिमित्त कासेगाव येथे ‘झेन झी आंदोलन व लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मुख्य प्रवाहातील टीव्ही माध्यमांनी ‘झेन झी’ आंदोलनाकडे सुरुवातीला सोयीस्कर दुर्लक्ष केले. मात्र, समाजमाध्यमांची ताकद वापरत या नवोदित तरुणाईने हे आंदोलन थेट जगभरात पोहोचवले. अंगावर लाठ्या झेलल्या, पाण्याचे फवारे सोसले, पण ही पोरं हटली नाहीत. सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर तर संसदेवर धडक देणाऱ्या या नव्या पिढीने प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घातले. “या आंदोलनाने चळवळी करणाऱ्या आमच्या पिढीच्या तोंडावर एक सणसणीत चपराक मारली आहे,” अशा शब्दांत चोरमारे यांनी तरुणाईचे कौतुक केले.

कार्यक्रमात डॉ. भारत पाटणकर यांनीही “अन्यायाविरुद्ध लाथ मारून परिवर्तन घडवणारी अशी पिढी दर दशकात निर्माण होते,” असे सांगत झेन झीचे कौतुक केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. दिलीप चव्हाण यांनी “तत्त्वज्ञान ही आता काही मोजक्या लोकांची मक्तेदारी राहिलेली नसून सर्वसामान्यांची मुलेही आज विचार मांडत आहेत,” असा टोला लगावला.

प्रारंभी त्रिशरण व पंचशील पठाणाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कॉ. जयंत निकम यांनी प्रास्ताविक केले, प्रा. मिलिंद पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲड. संदीप पाटील यांनी आभार मानले. या वैचारिक एल्गाराला भागातील नागरिक, विद्यार्थी व कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती लाभली होती.

 

 


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!