लेखण्या थांबल्या, राजकारण विरघळले ! आमदार-खासदारांच्या साक्षीने अभिषेक आणि दर्शना अडकले लग्नगाठीत..!

सदलगा : ‘लग्न पहावे करून आणि बातमी पाहावी लिहून’ असा एक नवा सुविचार सध्या आमच्या डोक्यात घोळत आहे. काल सदलगा नगरीत पत्रकारितेचे आणि समाजकारणाचे ‘अण्णासाहेब’ म्हणजेच आपले ज्येष्ठ पत्रकार आणि आर. के. फाउंडेशनचे सर्वेसर्वा अण्णासाहेब कदम यांच्या चिरंजीवांचा, चिरंजीव अभिषेक यांचा विवाह संपन्न झाला. आता पत्रकाराच्या घरातलं लग्न म्हटल्यावर तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंतच्या बातम्या कशा कव्हर होणार, या चिंतेत आम्ही होतो; पण प्रत्यक्ष मांडवात गेल्यावर समजले की सर्व बातम्या स्वतःहूनच पाय लावून मांडवात हजर झाल्या होत्या.

चिरंजीव अभिषेक यांनी बोरगावचे युवा उद्योजक ओंकार दादासाहेब भादुले यांची सुविद्य भगिनी ची. सौ. का. दर्शना यांच्याशी ‘ओम मल्टीपर्पज हॉल’ येथे विवाहगाठ बांधली. हा विवाह इतक्या ‘शाही थाटात’ झाला की, दोन क्षण वाटले आपण सदलगात नसून थेट कोण्या राजघराण्याच्या दरबारातच आलो आहोत.
नेत्यांची गर्दी की राजकीय अधिवेशन?
लग्नसोहळ्याला आलेल्या पाहुण्यांची यादी पाहिली तर हे लग्न होते की आगामी निवडणुकीच्या रणनीतीची पूर्वतयारी, असा संभ्रम कोणालाही पडावा! चिकोडी-सदलगा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय गणेशअण्णा हुक्केरी यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले. त्यांच्या जोडीला चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले हेही उपस्थित होते. सत्ताधारी आणि विरोधक एकाच मांडवात एकमेकांना पाहून ज्या पद्धतीने हसतमुख चेहरे करून फिरत होते, ते पाहून ‘लग्नाचे कौतुक’ की ‘राजकीय समेट’ यावर चर्चा रंगली नसती तरच नवल!
सदलगा शहराचे नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले यांच्यासह नगरसेवक संतोष नवले, उदय पाटील, प्रकाश अनुरे, लताताई पाटील, आणि राजू अमृतसंम्मानावर यांनी तर वऱ्हाड्यांपेक्षा जास्त हिरीरीने पाहुण्यांचे स्वागत केले.
सहकार आणि समाजकारणाचा संगम
कारखानदारीचे राजेही या सोहळ्याला आवर्जून हजर होते. हालशिद्दनाथ फॅक्टरीचे संचालक शरद जगंटे, दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुणकुमारजी देसाई यांच्या उपस्थितीमुळे लग्नकार्यात ‘गोडवा’ अधिकच वाढला होता. तर श्री गुरुदत्त शुगर लिमिटेड टाकळीवाडीचे संचालक बाळासाहेब पाटील यांच्या येण्याने त्याला अधिक धार आली. देववाडीचे माजी डेप्युटी सरपंच शिवाजीराव नांगरे पाटील आणि बेडकिहाळचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांनीही उपस्थिती लावून ग्रामीण भागातील वजन वाढवले. सुप्रसिद्ध वकील रमेश देसाई यांनी तर वधू-वरांचा हा ‘विवाह करार’ कायदेशीरदृष्ट्या कसा भक्कम आहे, अशाच अविर्भावात हजेरी लावली!
चौथ्या स्तंभाची ‘पंगत’!
आता घरच्या मालकाचे लग्न म्हटल्यावर पत्रकार मंडळी मागे कशी राहणार? ‘दैनिक पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव, ‘सकाळ’चे वृत्तसंपादक तानाजी पवार यांनी बातमीची ‘डेडलाईन’ सायंकाळपर्यंत सांभाळत मांडवात हजेरी लावली. वृत्त निवेदिका संध्या गावडे आणि पूजा पाटील , जानकी वृद्धाश्रम चे बाबासाहेब पुजारी, दत्तवाड पत्रकार संघाचे मिलिंद देशपांडे, मुन्नाभाई नदाफ, दिलीप शिरढोणे, इसाक नदाफ, यांच्या उपस्थितीमुळे मांडवात जणू ‘लाईव्ह बुलेटिन’ सुरू असल्याचा भास होत होता. शिरोळ, निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील पत्रकारांनी तर लेखण्या बाजूला ठेवून ‘अक्षता’ टाकण्यात धन्यता मानली. भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष राजू पाटील आणि चिकोडीचे नगरसेवक अनिल माने यांनीही या गर्दीत आपली उपस्थिती नोंदवली.
शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि असंख्य नागरिक बंधू-भगिनींच्या गर्दीमुळे हॉलमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. एकंदरीत, कदम आणि भादुले परिवाराचा हा विवाहसोहळा म्हणजे सदलगा शहराच्या इतिहासातील एक देखणा, ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय सोहळा ठरला, यात शंका नाही.
नूतन दांपत्याला संसारगाडीची नवी इनिंग सुरू करण्यासाठी आमच्या वृत्तपत्रीय शैलीत उदंड आणि सुखी आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा!



























